जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर्सची टीएसएमसी करणार निर्मिती

0
तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा (टीएसएमसी) लोगो तैवानमधील सिंचू येथील मुख्यालयातून (छायाचित्रः रॉयटर्स)

जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर्स तयार करण्यासाठी तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत (टीएसएमसी) अमेरिकेने नुकताच एक करार केला आहे. बायडेन सरकारने या प्रगत उत्पादन युनिटसाठी 6.6 अब्ज डॉलर्सचे अनुदान आणि 5 अब्ज डॉलर्सचे कमी किमतीचे सरकारी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ॲरिझोना येथे लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

टीएसएमसी ही जगातील सर्वात मोठी कंत्राटी चिप निर्माता कंपनी ॲरिझोना येथील प्रकल्पात जगातील सर्वात प्रगत 2-नॅनोमीटर तंत्रज्ञानाची निर्मिती करेल. 2028 मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

वाणिज्य सचिव गिना रायमोंडो यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, “या अशा चिप्स आहेत ज्या सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असतात. शिवाय आपल्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या तंत्रज्ञानासाठी या चिप्स अत्यावश्यक घटक आहेत, पण खरे सांगायचे तर, 21 व्या शतकातील लष्करी आणि राष्ट्रीय सुरक्षाविषयक उपकरणांसाठी त्यांची जास्त गरज आहे”.

बायडेन प्रशासनाने 2022 मध्ये चिप्स अँड सायन्स कायद्यावर स्वाक्षरी केली होती आणि 39 अब्ज डॉलर्सचे थेट अनुदान-तसेच 75 अब्ज डॉलर किमतीची कर्जे आणि हमी यासाठी राखून ठेवली होती. त्या अंतर्गत हा करार झाला आहे.

अमेरिकन सरकार सध्या जगातील 10 टक्क्यांपेक्षा कमी चिप्सचे उत्पादन करते आणि त्यात सर्वात प्रगत एकही चिप नाही.

टीएसएमसीसारख्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेला 2030 पर्यंत जगातील आघाडीच्या चिपपैकी अंदाजे 20 टक्के उत्पादन करण्यास मदत होईल.
वाणिज्य विभागाने सांगितले की, तैवानी कंपनीच्या तीन फॅक्टरीजमध्ये 5जी/6जी स्मार्टफोन, स्वायत्त वाहने आणि एआय डेटा सेंटर सर्व्हर यासाठी कोट्यवधी प्रगत चिप्सची निर्मिती केली जाईल. टीएसएमसीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये एएमडी, ऍपल, एनव्हीडिया आणि क्वालकॉम या कंपन्यांचा समावेश आहे.

टीएसएमसीकडून केली जाणारी 65 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक ही अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील पूर्णपणे नवीन प्रकल्पासाठी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक आहे, असे वाणिज्य विभागाने म्हटले आहे.

2022 मध्ये, अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव तसेच बीजिंगच्या तांत्रिक प्रगतीला आळा घालण्यासाठी, प्रगत चिप्स तयार करणाऱ्या चिनी कारखान्यांना उपकरणे पाठवण्यासाठी देशांतर्गत कंपन्यांना बंदी केली होती.

गेल्या काही वर्षांत, अमेरिकी सरकारने संभाव्य पुरवठ्यात निर्माण होणारे अडथळे मर्यादित करण्यासाठी अधिक चिप उत्पादन करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. कोरोनाच्या काळात, जगभरातील चिप वितरणामध्ये प्रचंड व्यत्यय निर्माण झाला होता आणि त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढल्या होत्या.

पिनाकी चक्रवर्ती

 


Spread the love
Previous article‘Expect The Unexpected’: Army Chief Gen Manoj Pande Warns Force
Next article‘अनपेक्षित आव्हानांच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here