चांद्रयान 4चे केले जाणार दुहेरी प्रक्षेपण; अंतराळात होणार जोडणी

0
चांद्रयान
इस्रो प्रमुख डॉ. सोमनाथ (फाइल फोटो)

‘चांद्रयान 4’ या चंद्रावरून नमुने गोळा करण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेबाबत एक नवीन खुलासा ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी केला आहे. या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या यानाचे भाग दोन प्रक्षेपणांमध्ये पाठवले जातील. त्यानंतर या भागांची अंतराळात जोडणी केली जाईल आणि मग चंद्राच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू राहील, असे सोमनाथ यांनी सांगितले.

इस्रोचे अध्यक्ष गुरुवारी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सध्या इस्रोद्वारे वापरल्या जाणाऱ्या सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण रॉकेटपेक्षा चांद्रयान 4 मिशनमध्ये जास्त वजन उचलले जाणार आहे. यादृष्टीने इस्रोने ही दुहेरी प्रक्षेपणाची कल्पना मांडली.

यापूर्वी अनेक मोहिमांमध्ये अंतराळात विविध मॉड्यूल्स जोडण्याची प्रक्रिया केली गेली आहे. मात्र यानाचे दोन भागांमध्ये प्रक्षेपण करून अंतराळात जोडणी करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते.

सोमनाथ म्हणाले की, अंतराळात  यानाच्या काही भागांची जोडणी करणारे डॉकिंग तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी या वर्षाच्या अखेरीस ‘स्पेडेक्स’ (स्पेस डॉकिंग प्रयोग) या नावाने केली जाईल.

जेव्हा अंतराळ यान चंद्रावरून पृथ्वीवर परत येते तेव्हा  मॉड्यूल्स एकत्र जोडली जातात. मॉड्यूल्सचे वजन समायोजित (adjust) करण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, लँडिंग दरम्यान, अंतराळ यानाचा एक भाग मुख्य प्रोबपासून वेगळा होईल आणि कक्षेत राहील. चंद्रावर उतरल्यानंतर आणि मोहीम पूर्ण केल्यानंतर, लँडर कक्षेत येईल आणि पूर्वी वेगळ्या झालेल्या कक्षीय विभागाशी जोडला जाईल. त्यानंतर त्या भागाच्या मदतीने ते पृथ्वीवर परत येईल.

मात्र चंद्राच्या प्रक्षेपण वाहनाचे मॉड्यूल्स पृथ्वीभोवतीच्या कक्षेत एकत्र करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इस्रोला या आधीच्या कोणत्याही मोहिमेत कधीही डॉकिंग करावे लागले नाही. ‘स्पेडेक्स’ च्या माध्यमातून डॉकिंग तंत्रज्ञान चाचणीचा भारताला भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी फायदा होईल. भारतीय ॲटमोस्फेरिक स्टेशन (बीएएस) नावाचे अंतराळ स्थानक उभारण्याची भारताची योजना आहे.

चांद्रयान 4 प्रकल्पाचा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याचे सोमनाथ यांनी यावेळी सांगितले. इस्रोच्या ‘व्हिजन 47’ उपक्रमांतर्गतील चार प्रकल्प प्रस्तावांपैकी हा एक आहे.

2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर मनुष्य पाठवणे हे व्हिजन 47चे उद्दिष्ट आहे.

सोमनाथ यांनी अंतराळ स्थानकाशी संबंधित काही माहितीही उपस्थितांना दिली. ते म्हणाले की, अंतराळ स्थानकाच्या संदर्भात सरकारला देण्यात येणाऱ्या तपशीलवार माहितीचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

बीएएसच्या पहिल्या भागाचे प्रक्षेपण सध्याच्या प्रक्षेपण वाहन 3 रॉकेटचा वापर करून केले जाईल. 2028 मध्ये याचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित स्थानक सुधारित एलव्हीएम-3 रॉकेट आणि निर्माण होत असलेल्या नवीन अवजड रॉकेट, नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (एनजीएलव्ही) वापरून प्रक्षेपित केले जाईल, असेही ते म्हणाले.

सोमनाथ पुढे म्हणाले की, एनजीएलव्हीसाठी सध्याचे केंद्र उपयुक्त नसल्याने नवीन प्रक्षेपण केंद्र बांधले जात आहे.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleIsrael Seeks Quick Release Of Munitions From The United States, Both Sides Discuss Gaza
Next articleहाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट ‘अभ्यास’च्या सर्व चाचण्या यशस्वी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here