हाँगकाँगमध्ये रागासा चक्रीवादळचे थैमान, अतीवृष्टीमुळे 14 जणांचा मृत्यू

0

बुधवारी, या वर्षातील सर्वात शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळ रागासाने, हाँगकाँगमध्ये जबरदस्त वारे आणि मुसळधार पावसासह थैमान घातले आहे. दरम्यान, तैवानमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे किमान 14 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अतीवृष्टीमुळे, तैवानच्या ह्वालियेन प्रांतात एक नैसर्गिक तलाव भरून वाहू लागला आणि एका गावात पाण्याचा प्रचंड लोट शिरला, असे तैवान अग्निशमन विभागाने बुधवारी सांगितले.

सोमवारपासूनच रागासा चक्रवादळीच्या बाह्य वर्तुळामुळे तैवानमध्ये मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे.

हाँगकाँगमध्ये, मोठमोठ्या लाटांनी शहराच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीवर जोरदार आघात केला, त्यामुळे काही रस्ते आणि निवासी भाग पाण्यात बुडाले.

दक्षिण हाँगकाँगमधील Fullerton हॉटेलमध्ये, समुद्राचे पाणी काचांमधून आत शिरतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. बुधवारी या हॉटेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

त्सयुंग क्वान ओ सारख्या घनदाट वस्ती असलेल्या भागात, जे मोठ्या प्रमाणावर भरावावर उभारलेले आहेत, तिथेही प्रचंड लाटांनी किनारपट्टीवरचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला.

लांटाऊ बेटावर, जिथे शहराचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तिथेही पूर परिस्थिती निर्माण झाली असून समुद्रकिनारे आणि वनस्पती झाकून गेल्या आहेत.

“पूर्वी सुरक्षित वाटणारे भागही आता धोक्याच्या झोनमध्ये येऊ शकतात, समुद्रात प्रचंड उधाण येऊ शकतात” असे हवामान विभागाने सांगितले.

रागासा अजूनही सुपर टायफूनच्या श्रेणीत

रागासा चक्रीवादळामध्ये 200 किमी प्रतितास (124 mph) वेगाचे वारे असून, हे वादळ पुढील काही तासांत हाँगकाँगपासून अवघ्या 100 किमी (60 मैल) अंतरावर असणार आहे.

रागासा चीनच्या ग्वांगडोंग प्रांताच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे, जिथे 125 दशलक्षाहून अधिक लोक राहतात. मध्यान्हाच्या सुमारास ते किनाऱ्यावर धडक देण्याची शक्यता आहे.

सोमवारी, रागासा वादळाने फिलिपाइन्सच्या उत्तर भागात, तर मंगळवारी तैवानमध्ये हाहाकार माजवला.

वादळाच्या भीतीने हाँगकाँगमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली, सुपरमार्केटमध्ये गर्दी झाली आणि तासन्‌तास रांगेत उभं राहून लोकांनी अत्यावश्यक वस्तू घेतल्या, कारण दुकानं 2 दिवस बंद राहतील अशी भीती होती.

वादळ येण्याआधी लोकांनी आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना करायाला सुरुवात केली होती.

हाय अलर्ट जारी

बुधवारी, हाँगकाँगने टायफून सिग्नल 10, म्हणजेच सर्वोच्च इशारा जारी केला. यामध्ये व्यवसाय आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

त्यासोबतच, अंबर रेनस्टॉर्म सिग्नल सिग्नल देखील जारी करण्यात आला, कारण मुसळधार पावसाची शक्यता असून काही रस्ते अंशतः पाण्याखाली गेले होते, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने नोंदवले.

हवामान विभागानुसार, समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होऊन ती 4 मीटर (13 फूट) पर्यंत पोहोचू शकते, जी 2017 मधील टायफून हॅटो आणि 2018 मधील मंगखूट यांच्याशी साधर्म्य साधणारी आहे. दोन्हीवेळेला अब्जो डॉलरचे नुकसान झाले होते.

SCMP च्या माहितीनुसार, एका महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलासोबत वादळ पाहण्यासाठी समुद्रकिनारी गेले असता ते दोघंही पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यात आलं असून, ते सध्या intensive care मध्ये आहेत.

शहरातील 49 तात्पुरती निवासस्थाने उघडण्यात आली आहेत, आणि 727 लोकांनी तिथे आश्रय घेतला आहे.

दरम्यान, हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंज सुरूच राहिले कारण त्यांनी गेल्यावर्षी धोरण बदलून, हवामान कसेही असले तरी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleलष्कराच्या थिएटरायझेशनविषयी, हवाई दल प्रमुखांची चिंता योग्य आहे का?
Next articleतालिबानच्या इंटरनेट बंदीमुळे, अफगाण महिलांची डिजिटल लाईफलाईन बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here