ट्रम्प-जिनपिंग यांच्यात यशस्वी बैठक; ट्रम्प यांनी शुल्क 47% पर्यंत कमी केले

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी गुरुवारी जाहीर केले की, “चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या ‘यशस्वी’ बैठकीनंतर, त्यांनी चिनी वस्तूंवरील शुल्क 47% पर्यंत कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.” या बदल्यात चीन अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी पुन्हा सुरू करेल, तसेच दुर्मिळ खनिजांची निर्यात सुरू ठेवेल आणि फेन्टॅनाइल तस्करीवर नियंत्रण देखील ठेवेल.

दक्षिण कोरियाच्या बुसान शहरात, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या प्रत्यक्ष चर्चेनंतर, ट्रम्प यांनी केलेले हे वक्तव्य त्यांच्या झंझावाती आशिया दौऱ्याचा शेवटचा टप्पा होता, ज्यामध्ये त्यांनी दक्षिण कोरिया, जपान आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांसोबतच्या व्यापारी प्रगतीचाही उल्लेख केला. तसेच 2019 नंतर झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीचाही आवर्जून उल्लेख केला. 

बुसानमधून निघाल्यानंतर, एअरफोर्स वन विमानामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला ही बैठक अत्यंत फलदायी वाटली”, तसेच त्यांनी स्पष्ट केले की, ‘चिनी आयातीवरील शुल्क 57% वरून 47% पर्यंत कमी केले जाईल.’

ट्रम्प यांनी या कराराचे तपशील उघड केल्यामुळे, जागतिक स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार दिसून आले. प्रमुख आशियाई निर्देशांक आणि युरोपीय फ्युचर्स नफा आणि तोटा यामध्ये हेलकावे घेत होते. चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्सही गेल्या 10 वर्षांच्या उच्चांकावरून खाली घसरला, तर अमेरिकेच्या सोयाबीन फ्युचर्समध्येही घट दिसून आली.

व्यापार युद्धात यश

चीन आणि अमेरिका या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धामुळे, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती आणि व्यावसायिक आत्मविश्वास डळमळीत झाला होता. यामध्ये सुधारणा होण्याची आशा असलेल्या या बैठकीपूर्वी, वॉल स्ट्रीटपासून ते टोकियोपर्यंतच्या जागतिक शेअर बाजारांनी विक्रमी उच्चांक गाठला होता.

आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) परिषदेदरम्यान झालेली ही बैठक, जवळपास दोन तास चालली. ट्रम्प यांनी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडले. त्यानंतर ट्रम्प यांना विमानतळावर ‘रेड कार्पेट’ निरोप देण्यात आला.

अमेरिकेच्या वार्ताहरांनी रविवारी सांगितले होते की, ‘त्यांनी चीनसोबत अशा एका व्यापार चौकटीवर सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे चिनी वस्तूंवर 100% अमेरिकन शुल्क लागणार नाही आणि दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील (ज्या क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे) चीनच्या निर्यात निर्बंधांना स्थगिती मिळेल. त्यानंतर ट्रम्प वारंवार जिनपिंग यांच्याशी करार होण्याची शक्यता व्यक्त करत होते.

परंतु, आर्थिक आणि भू-राजकीय स्पर्धेच्या क्षेत्रांमध्ये, दोन्ही देश आता ‘कठोर भूमिका’ घेण्यास अधिक इच्छुक असल्याने, हा व्यापार-संघर्षविराम किती काळ टिकेल याबाबत अनेक प्रश्न कायम आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleExercise Trishul: India’s Massive Tri-Service Wargame That Has Pakistan on Edge
Next articleLockheed Martin’s 11th India Suppliers Conference to Focus on Self-Reliance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here