चीनची सर्वात नवीन, अणुऊर्जेवर चालणारी, हल्ला करणारी पाणबुडी या वर्षाच्या सुरुवातीला बुडाल्याचा दावा अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने गुरुवारी केला. ते म्हणाले की चीनसाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असू शकते कारण ते आपली लष्करी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे.
चीनकडे आधीच 370 हून अधिक जहाजांसह जगातील सर्वात मोठे नौदल आहे आणि त्याने अण्वस्त्रधारी पाणबुड्यांच्या नव्या जनरेशनचे उत्पादन सुरू केले आहे.
अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, चीनची नवीन, प्रथम श्रेणीची, अणुऊर्जेवर चालणारी, हल्ला करणारी पाणबुडी मे ते जून या काळात कधीतरी बुडाली.
नो कमेंट्स
वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्याकडे या संदर्भात देण्यासाठी कोणतीही माहिती नाही.
“तुम्ही नमूद केलेल्या परिस्थितीबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत आणि सध्या आमच्याकडे देण्यासाठी कोणतीही माहिती नाही”, असे चिनी अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की पाणबुडी बुडण्याचे कारण किंवा त्यावेळी जहाजावर अणु इंधन होते की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
या अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रशिक्षणाबाबतचे नियम आणि उपकरणांच्या गुणवत्तेच्या व्यतिरिक्त, या घटनेमुळे पीएलएची अंतर्गत जबाबदारी आणि चीनच्या संरक्षण उद्योगाच्या देखरेखीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात कारण हे दोघेही बऱ्याच काळापासून भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. “पीएलएचे नौदल ही बातमी लपवण्याचा प्रयत्न करेल यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
तैपेईमध्ये शुक्रवारी बोलताना तैवानचे संरक्षण मंत्री वेलिंग्टन कू म्हणाले की, अधिकाऱ्यांना “अनेक गुप्त आणि पाळत ठेवण्याच्या पद्धतींमधून परिस्थितीची समजून घेता आली आहे,” मात्र त्यांनी कोणतीही तपशीलवार माहिती दिली नाही.
सॅटेलाइट छायाचित्रे
ज्या तैवानला चीन आपला प्रदेश मानतो, त्याच तैवानच्या लष्करी हालचालींवर त्याचे बारीक लक्ष असते. जूनमध्ये, तैवानच्या मच्छिमारांच्या तैवान सामुद्रधुनीमधील बोटींजवळ चिनी आण्विक पाणबुडी असल्याची छायाचित्रे ऑनलाइन दिसली होती.
चिनी पाणबुडीची बातमी प्रथम वॉल स्ट्रीट जर्नलने छापली होती.
जूनपासून प्लॅनेट लॅबच्या उपग्रह प्रतिमांच्या मालिकेत वुचांग शिपयार्डमध्ये क्रेन दिसत आहेत, जिथे पाणबुडी उभी करण्यात येणार होती.
चिनी लष्करी युद्धसाहित्य
चिनी लष्कराच्या संदर्भात पेंटागॉनच्या अहवालानुसार, 2022 पर्यंत चीनकडे अणुऊर्जेवर चालणाऱ्या सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या, अणुऊर्जेवर चालणाऱ्या सहा ॲटॅक पाणबुड्या आणि 48 डिझेलवर चालणाऱ्या ॲटॅक पाणबुड्या होत्या. 2025 पर्यंत 65 आणि 2035 पर्यंत 80 अशी या पाणबुड्यांची संख्या वाढण्याची अपेक्षा असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.
प्रशांत महासागरात आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केल्याचे बुधवारी चीनने जाहीर केले. यामुळे देशाच्या आण्विक उभारणीबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.
दक्षिण चीन सागरासारख्या मुख्य प्रादेशिक ठिकाणी लष्करी संबंध स्थिर करणे आणि गैरसमज टाळणे यादृष्टीने सुरू असणाऱ्या प्रयत्नांदरम्यान अमेरिका आणि चीनने या महिन्याच्या सुरुवातीला प्रथमच थिएटर लेव्हल कमांडर चर्चेचे आयोजन केले होते.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)