यूएस नौदलाने अनवधानाने स्वतःचेच F/A-18 विमान पाडले

0
यूएस
यूएस नौदलाचे टिकॉन्डरोगा-क्लास मार्गदर्शित-क्षेपणास्त्र क्रूझर USS गेटिसबर्ग 16 डिसेंबर 2024 रोजी लाल समुद्रात बघायला मिळाले. (REUTERS)

रविवारी पहाटे लाल समुद्रावर स्वतःचे एक लढाऊ विमान चुकून पाडल्याची कबूली यूएस सैन्याने दिली आहे. या हल्ल्यामुळे विमानातील दोन्ही वैमानिकांना बाहेर पडणे भाग पडले. यूएस सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘या गोळीबार’च्या  प्रकरणानंतर हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली, ज्यापैकी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. क्षेपणास्त्र सोडणारे जहाज आणि विमान दोन्हीही अमेरिकेच्या नौदलाचे होते.

विमानवाहू जहाज हॅरी एस. ट्रूमॅनवरून उड्डाण करणारे F/A-18 हॉर्नेट हे नौदलाचे लढाऊ विमान होते. निवेदनात म्हटले आहे की वाहक जहाजांपैकी एक, क्षेपणास्त्र क्रूझर गेटिसबर्गने चुकून विमानावर गोळीबार केला आणि त्यातील गोळ्या विमानाला जाऊन धडकल्या.

यूएस सैन्याने येमेनच्या इराण-समर्थित हुथी मिलिशियाशी लढा देत असताना लाल समुद्र हे एका वर्षाहून अधिक काळ लष्करी कारवायांचे केंद्र बनले आहे. हुथीने या प्रदेशातून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत.

यूएस सैन्याने सांगितले की त्यांनी शनिवारी लाल समुद्रावर हुथी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांवर गोळीबार केला तसेच सानामधील कमांड-अँड-कंट्रोल आणि क्षेपणास्त्र स्टोरेज साइटवर हल्ला केला.

यूएस सैन्याच्या सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे की, “हुथींच्या कारवायांमध्ये व्यत्यय आणणे आणि त्या असफल करणे हा या हल्ल्यांचा उद्देश आहे. यूएस नेव्हीच्या युद्धनौका आणि दक्षिणी लाल समुद्र, बाब अल-मंदेब आणि एडनच्या आखातातील व्यापारी जहाजांवर हल्ले करणे हा हुथींचा या मुख्य उद्देश आहे.

यूएस नेव्हीने असेही म्हटले आहे की त्यांनी लाल समुद्रावर  हुथींकडून आलेले अनेक वन-वे ड्रोन आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला.

येमेनचा बराचसा भाग नियंत्रित करणाऱ्या हुथींनी चालवलेल्या कमांड आणि कंट्रोल सुविधेवर गेल्याच आठवड्यात यूएस विमानाने अशाच प्रकारचा हल्ला केल्यानंतर शनिवारचा हल्ला झाला.

गुरुवारी इस्रायलने येमेनचा हुथींच्या ताब्यात असलेल्या भागांमधील बंदरे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले. गेल्या वर्षभरात इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागणाऱ्या या गटावर आणखी हल्ले करण्याची धमकी त्यांनी दिली.

येमेनमधील इराण समर्थित बंडखोर गट गाझामधील इस्रायलच्या वर्षभर चाललेल्या युद्धात पॅलेस्टिनींला पाठिंबा दाखवत त्यांच्यासोबत एकजुटीने काम करत असल्याचा दावा केला. त्यामुळे इस्रायलवर सागरी मार्गावरील नाकाबंदी लागू करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एका वर्षाहून अधिक काळापासून लाल समुद्रातील मलवाहतूक जहाजांवर हल्ला करत आहे.

टीम भारतशक्ती

(REUTERS)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here