गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शस्त्रास्त्रांच्या प्रतिज्ञा परिषदेचा अंतिम मेळावा होणार असून, यामध्ये अमेरिका युक्रेनसाठी 500 दशलक्ष डॉलर्सची विशेष लष्करी मदत जाहीर करणार असल्याची अपेक्षा आहे.
युक्रेन डिफेन्स कॉन्टॅक्ट ग्रुप (UDCG), ज्यामध्ये सुमारे 50 मित्र देशांचा समावेश आहे, ते सामान्यत: जर्मनीतील रामस्टाईन एअर बेसवर काही महिन्यांनी नियमीत एकत्र जमतात. युक्रेनची राजधानी कीवच्या म्हणण्यानुसार, या बैठका आजवर रशियाविरूद्धच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
UDCG ग्रुपची सुरुवात, यू.एस. संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन, यांनी 2022 मध्ये केली होती. कीवला पुरवण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या वितरणाला गती देण्यासाठी आणि समक्रमित करण्यासाठी या गटाची स्थापना केली होती.
मात्र अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, 20 जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार असल्याने, स्ध्या गटाचे भविष्य अस्पष्ट आहे.
ट्रम्पच्या सल्लागारांनी युक्रेन युद्ध संपवण्याचे प्रस्ताव मांडले आहेत, जे नजीकच्या भविष्यासाठी देशाचा मोठा भाग रशियाकडे सोपवतील.
रशियाच्या आक्रमणानंतर, वॉशिंग्टनने युक्रेनला 63.5 अब्ज डॉलर्सहून अधिक सुरक्षा सहाय्य पुरवले असून, बुधवार नंतर त्यांच्याकडून सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त घोषणा केली जाऊ शकते, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर रॉटर्सला सांगितले.
गुरुवारी, 25 व्या UDCG बैठकीसाठी सर्व संरक्षण नेते रामस्टाईन एअर बेसवर एकत्र येतील.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने गुप्तता राखत असे सांगितले की, ”आम्ही या गटाची सांगता करु इच्छित नाही. अमेरिकेत येणारे पुढील प्रशासनही याचे पूर्णत: स्वागत करते आणि 50 मित्रराष्ट्र असलेल्या या बलवान गटाची धुरा स्वीकारण्यासाठी आणि ती पुढे नेण्यासाठी समर्थन करते.”
ते पुढे म्हणाले की, ‘मला विश्वास आहे, या गटाचे कार्य पुढे देखील सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच कार्यालयीन पदभार स्विकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे काही अब्ज डॉलर्सची मंजूर केलेली रक्कम असेल, जी ते युक्रेनी सैन्याच्या मदतीसाठी वापरु शकतात.’
‘गुरुवारची ही बैठक 2027 पर्यंत, युक्रेनच्या लष्करी गरजा आणि उद्दिष्टांसाठी रोडमॅप्सचे समर्थन करेल’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुमारे तीन वर्षांपूर्वी रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून, युक्रेनसोबतच्या या युद्धात 12 हजारांहून हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. ड्रोन हल्ला, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ग्लाईड बॉम्बच्या वापरामुळे होणारी जीवितहानी वाढल्याचे संयुक्त राष्ट्रांनी नमूद केले आहे.
युक्रेनने मंगळवारी असे जाहीर केले की, त्यांचे सैन्य रशियाच्या पश्चिमकडे असलेल्या कुर्स्क प्रदेशात “नवीन आक्षेपार्ह कारवाया सुरू करत आहेत”.
युक्रेनने गेल्या ऑगस्टमध्ये अचानक कुर्स्क प्रदेशाचा काही भाग ताब्यात घेतला होता. त्यानंतर काही जागा गमावूनही युक्रेन गेल्या पाच महिन्यांपासून त्या प्रदेशात तळ ठोकून आहे.
कुर्स्क प्रदेशातील लढायांचे वाढते प्रमाण, युक्रेनसाठी खूप चिंतेची बाब आहे. कारण रशियासमोर युक्रेनची सैन्य संख्या आणि शस्त्रास्त्रांचा साठा कमी पडत आहे आणि अशातच ते रशियाचा पूर्वेकडील प्रभाव रोखण्यासाठी संघर्ष करत आहेत.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)