इराण, लेबनॉनचे हवाई क्षेत्र टाळा :  ब्रिटन, इजिप्तचा सल्ला

0
3

हमास आणि हिजबुल्लाच्या वरिष्ठ सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येनंतर या प्रदेशात संघर्ष वाढण्याच्या भीतीने ब्रिटन आणि इजिप्तने त्यांच्या विमान कंपन्यांना इराण आणि लेबनॉनची हवाई हद्द टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

विमानसेवेबाबतचा तपशील

इजिप्तने आपल्या विमान कंपन्यांना गुरुवारी पहाटे तीन तासांसाठी इराणची हवाई हद्द टाळण्याचे निर्देश दिले. त्यानंतर लगेचच ब्रिटनकडूनही विमान कंपन्यांना लेबनॉनची हवाई हद्द टाळण्याचा सल्ला जारी करण्यात आला. जगभरातील विमान कंपन्या इराणी आणि लेबनॉनच्या हवाई क्षेत्रापासून दूर राहण्यासाठी आणि इस्रायल तसेच लेबनॉनला जाणारी उड्डाणे स्थगित करण्याच्या दृष्टीने वेळापत्रकात सुधारणा करत असताना अशाप्रकारचे पाऊल उचलण्यात आले आहे.

हवाई क्षेत्राच्या सुरक्षिततेचा ऐतिहासिक संदर्भ

मलेशिया एअरलाइन्सच्या MH17 या विमानावर दशकभरापूर्वी युक्रेनच्या हवाई हद्दीत गोळीबार झाला होता. त्यावेळी झालेल्या अपघातात विमानातील सर्व 298 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर संघर्षात्मक क्षेत्रामधून होणाऱ्या विमान उड्डाणांच्या समस्येला मोठे महत्त्व प्राप्त झाले. या दु:खद घटनेनंतर विमान वाहतूक उद्योगातील सतर्कता वाढली आहे.

विशिष्ट विमानसेवांनी उचललेली पावले

युनायटेड एअरलाइन्सः अमेरिकेतील युनायटेड एअरलाइन्सने सुरक्षेच्या कारणास्तव 31 जुलैपासून तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. ती सेवा पुन्हा कधी सुरू होईल याची तारीख जाहीर केलेली नाही.

डेल्टा एअर लाइन्स :  डेल्टाने न्यूयॉर्क आणि तेल अवीव दरम्यानची उड्डाणे किमान 31 ऑगस्टपर्यंत थांबवली आहेत.

ब्रिटिश कॅरिअर :  फ्लाइटरडार 24ने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश कॅरिअरची विमाने सध्या लेबनॉनला उड्डाण करत नाहीत.

सिंगापूर एअरलाइन्सः गेल्या शुक्रवारी, सिंगापूर एअरलाइन्सने इराणी हवाई हद्दीतून जाणाऱ्या आपल्या विमानांची उड्डाणे बंद केली असून सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करत आहे.

इजिप्तचे निर्देश आणि लष्करी सराव

इजिप्शियन विमान कंपन्या या आधीच ग्रिनीच प्रमाणवेळेनुसार आतापर्यंत 01.00 ते 04.00 या काळात इराणी हवाई क्षेत्र टाळत होत्या. गुरुवारपासून नवीन निर्देश सर्व इजिप्शियन वाहकांना लागू होतात. इराणी हवाई हद्दीत होणाऱ्या नियोजित लष्करी कवायतींना प्रतिसाद म्हणून जारी केलेल्या सुरक्षा सूचनेनंतर (एनओटीएएम) हे निर्देश देण्यात आले आहेत.

लष्करी कवायतींविषयी इराणी अधिकाऱ्यांच्या अधिसूचनेचा हवाला देत इजिप्तच्या नागरी विमानवाहतूक मंत्रालयाने या सूचनांना दुजोरा दिला. इराणचे प्रभारी परराष्ट्रमंत्री अली बघेरी कानी यांनी बुधवारी इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांशी उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली.

अलीकडील घटना आणि खबरदारी

2020 मध्ये, इराणच्या हवाई संरक्षण विभागाने चुकून युक्रेनियन इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान पीएस 752 पाडले, ज्यात सर्व 176 जणांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी अमेरिका-इराण यांच्यातील तणाव प्रचंड वाढला होता. सध्याच्या परिस्थितीत सावधगिरी म्हणून, जॉर्डनने आपल्या विमान कंपन्यांना अतिरिक्त इंधन वाहून नेण्यास सांगितले आहे.

रेशम
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here