संरक्षणखर्चातही वाढ: ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांची माहिती
दि. १४ मे: संरक्षणदलांना आधुनिक व युद्धसज्ज करण्याच्या उद्देशाने ब्रिटनने संरक्षण खर्चात वाढ केली असून, त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटनच्या शाही नौदलासाठी सहा नव्या युद्धनौका बांधण्यात येणार असल्याची माहिती ब्रिटनचे संरक्षणमंत्री ग्रँट शाप्स यांनी दिली आहे. त्यामुळे संरक्षण अंदाजपत्रकात केलेली वाढ नक्की कोठे खर्च होणार आहे, याचे संकेत देण्यास ब्रिटनने सुरुवात केली आहे, असे मानले जात आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी, ब्रिटनच्या संरक्षण अंदाजपत्रकात एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या अडीच टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जाहीर केले होते. ‘सध्या सगळे जग शीतयुद्धानंतरच्या सर्वांत गंभीर आणि धोकादायक परिस्थितीतून जात असून, त्याचा सामना करण्यासाठी ब्रिटनच्या शस्त्रास्त्र उत्पादन उद्योगाने युद्धपातळीवर काम सुरु करण्याची गरज आहे,’ असेही सुनक यांनी म्हटले
होते. ब्रिटिश नौदलासाठी बांधण्यात येणाऱ्या या सहा नव्या युद्धनौका त्याचेच द्योतक असल्याचे मानले जात आहे. ‘ही नवी जहाजे बहुपयोगी आधार जहाजे (मल्टी रोल सपोर्ट शिप) या प्रकारातील असून, ब्रिटिश ‘कमांडोज’च्या उभयचर (जमीन आणि समुद्रातील) विशेष लष्करी मोहिमांसाठी आणि भविष्यातील युद्धांसाठी त्यांचा उपयोग होईल,’ असे संरक्षणमंत्री शाप्स यांनी म्हटले आहे. ‘ब्रिटिश शाही नौदलासाठी नवी जहाजे बांधण्यात येतील, असे सरकारने २०२२मध्ये म्हटले होते. संरक्षण विषयावर अधिक खर्च करण्याची तयारी सरकारने केली असल्यामुळे आता ते शक्य होणार आहे,’ असे शाप्स यांनी ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कोर्पोरेशन’ला (बीबीसी) दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ब्रिटनच्या नौदलाकडून सध्या वापरण्यात येत असलेल्या एचएमएस अल्बिओन आणि एचएमएस बुलवर्क या दोन्ही युद्धनौका भंगारात काढल्या जाणार नाहीत. त्यांचा कार्यकाल संपेपर्यंत म्हणजे २०३३-३४ पर्यंत त्या वापरण्यात येतील, असे शाप्स यांनी ‘सी पॉवर कॉन्फरन्स’मध्ये बोलताना सांगितले. ब्रिटिश नौदलासाठी २८ युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याचा प्रकल्प सध्या हाती घेण्यात आला आहे. या सहा युद्धनौकाही त्याच प्रकल्पाचा भाग आहेत. या प्रकल्पामुळे ब्रिटनच्या देशांतर्गत जहाजबांधणी उद्योगाला पुन्हा सोन्याचे दिवस दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्रिटनच्या संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेली बीएई सिस्टीम्स आणि बाबकॉक बीएबी.एल या कंपन्या या प्रकल्पामध्ये सहभागी आहेत. त्यांच्या मार्फतच ही २८ जहाजे बांधण्यात येणार असल्याचे समजते.
विनय चाटी
(‘रॉयटर्स’च्या ‘इनपुट्स’सह)