नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी शुक्रवारपासून मतदानाला सुरूवात होत आहे. मात्र रशियाने युक्रेनच्या ज्या प्रदेशांवर कब्जा मिळवला आहे तिथेही रशियाकडून होणारे मतदान ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युक्रेन भाग असलेल्या पण आता रशियाच्या तात्पुरत्या ताब्यात असलेल्या प्रदेशांमध्ये – क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक आणि सेवास्तोपोल शहर , युक्रेनच्या डोनेट्स्क , लुहान्स्क , झापोरिझ्हिया आणि खेरसन प्रदेशांचे काही भाग – रशियन फेडरेशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका घेणे बेकायदेशीर आहे आणि येणारे निकालदेखील बेकायदेशीर ठरतील.
ताब्यात घेतलेल्या या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या युक्रेनियन नागरिकांना रशियात सामील होण्यासाठी जबरदस्ती करणे तितकेच बेकायदेशीर आहे आणि या “खोट्या निवडणुकांच्या” कोणत्याही निकालांच्या वस्तुनिष्ठतेवर आणि वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
रशियाच्या तात्पुरत्या ताब्यात असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या किंवा रशियन फेडरेशनच्या प्रदेशात राहण्यास भाग पाडल्या गेलेल्या युक्रेनियन नागरिकांना आम्ही रशियन अध्यक्षांच्या “खोट्या – निवडणुकांमध्ये ” भाग न घेण्याचे आवाहन करतो. निवडणुकीच्या दिवशी , रशियन अधिकाऱ्यांची चिथावणी देणारी प्रवृत्ती लक्षात घेता, आम्ही नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी “मतदान केंद्रां” जवळची गर्दीची ठिकाणे आणि रशियाच्या ताब्यात असलेल्या सैन्याच्या लष्करी पायाभूत सुविधा टाळण्याचे आवाहन करतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.
युक्रेनच्या या निवेदनावर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशियाच्या निवडणुका 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहेत, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा विजय पूर्वनिश्चित असल्याचे मानले जाते. विरोधी पक्षाचे लोकप्रिय नेते ॲलेक्सी नवाल्नी – ज्यांना आर्क्टिक सर्कलजवळच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते – यांचे 16 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे रशियन अधिकारी सांगतात. याशिवाय रशियन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार स्वाक्षऱ्यांच्या संख्येत विसंगती असल्यामुळे आणखी एक विरोधी राजकारणी बोरिस नादेझदीन यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे पुतीन यांच्या विरोधात कोणीही तुल्यबळ नेता निवडणूक रिंगणात नाही.
युक्रेनच्या कडव्या लढाऊ सैनिकांनी निवडणुकीपूर्वी रशियाच्या सीमावर्ती भागात अलीकडेच केलेल्या हल्ल्यांमुळे रशियाला धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाला यासंदर्भात कारवाई करण्याचे आवाहन करत युक्रेनने या निवेदनाचा समारोप करताना म्हटले आहे, “परदेशी राज्ये आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना आणखी एका प्रहसनात सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक पाठवू नयेत असे आपण आवाहन करीत असून क्रेमलिन या युक्रेनच्या सार्वभौम प्रदेशात रशियाची अध्यक्षीय पदासाठीची निवडणूक होऊ नये तसेच या “निवडणुकांच्या” निकालांना मान्यता देऊ नये. युक्रेनियन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल, असा इशारा देत आहोत.”
अश्विन अहमद