रशियाचे 29 पैकी 28 ड्रोन नष्ट केल्याचा युक्रेनच्या हवाई दलाने मंगळवारी दावा केला. युक्रेनच्या खार्किव प्रांताच्या गव्हर्नरने सांगितले की या परिसरात सोमवारी रात्रभर रशिया बॉम्ब वर्षाव करत होता. तर दुसरीकडे युक्रेनच्या अनेक प्रदेशांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात ड्रोन सोडण्यात आले.
खार्किव्हचे राज्यपाल ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सांगितले की, नष्ट करण्यात आलेल्या ड्रोन्समुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून किमान तीन नागरिक जखमी झाले आहेत.
निप्रोपेट्रोव्हस्क प्रांताचे राज्यपाल सेरही लिसाक यांनी सांगितले की, पाडण्यात आलेल्या ड्रोन्सच्या ढिगाऱ्यामुळे व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी मित्र राष्ट्रांनी युक्रेनला हवाई संरक्षण प्रणाली आणि नवीन लढाऊ विमाने पुरवून युद्धासाठी परत एकदा सज्ज करावे असे आवाहन केल्यानंतर रशियाकडून परत एकदा असे हल्ले करण्यात आले.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षणाने बेलगोरोड प्रदेशात एक मार्गदर्शित क्षेपणास्त्र आणि दोन हवाई ड्रोन तर कुर्स्क प्रदेशात आणखी एक ड्रोन नष्ट केले.
बेलगोरोडचे प्रादेशिक राज्यपाल व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी सांगितले की युक्रेनकडून सोडण्यात आलेले ड्रोन एका कारवर जाऊन आदळले, ज्यात किमान एक व्यक्ती ठार झाली.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन आणि युरोप तसेच जगभरातील किमान 50 इतर संरक्षण नेते सोमवारी युक्रेनला लष्करी पाठिंबा देण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भेटले. सध्या युक्रेनच्या खार्किव प्रदेशात रशियाकडून नव्याने जोरदार हल्ले सुरू झाले आहेत.
ऑस्टिन म्हणाले की सोमवारी झालेली बैठक “मोठ्या आव्हानाच्या वेळी” पार पडली आहे. मात्र “आठवड्यामागून आठवडे” युक्रेनला अमेरिकी शस्त्रे पाठवली जातील असे त्यांनी आश्वासन दिले.
राजकीय पेचप्रसंगामुळे युक्रेनियन सैन्याला मदत करण्याच्या उद्देशाने घोषित केलेल्या मदत पॅकेजला अनेक महिने मंजूरी मिळत नव्हती. एप्रिलच्या अखेरीस अमेरिकी काँग्रेस आणि अध्यक्ष जो बायडेन यांनी 61 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली.
ऑस्टिन यांच्या मते, अमेरिकेचे सध्याचे नवे मदत पॅकेज युक्रेनला खार्किव आणि रशियाच्या माऱ्याला तोंड देणाऱ्या इतर भागांसाठी साहाय्य करेल.
“आम्ही युक्रेनच्या अनेक सर्वोच्च-प्राधान्य गरजा आधीच पूर्ण केल्या आहेत. आणखी मदत लवकरच करण्यात येणार आहे. त्यामध्ये नॅशनल एडवान्स्ड सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीम (NASAMS) आणि हवाई-संरक्षण प्रणाली, याशिवाय हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम (HIMARS) आणि दारुगोळा, स्टिंगर विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि जेव्हलिन आणि एटी- 4 चिलखतविरोधी प्रणालींसाठी अतिरिक्त युद्धसामग्री समाविष्ट आहे,” असे ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. “या पॅकेजमध्ये चिलखती वाहनांचाही समावेश आहे. आणि युक्रेनच्या शस्त्रागाराची पुनर्रचना करण्यासाठी ते आवश्यक आहे.”
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवरून)