युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी बुधवारी राजीनामा दिला. रशियाविरुद्धच्या 30 महिन्यांच्या युद्धातील हा सर्वात मोठा सरकारी फेरबदलाचा भाग मानला जात आहे.
याआधी पाच मंत्री मंगळवारी पायउतार झाले. येत्या काही दिवसांत आणखी मंत्री राजीनामे देण्याची शक्यता असून त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या होणे अपेक्षित आहे कारण युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या वरिष्ठ सहकाऱ्याने हिवाळ्यापूर्वी सरकारची “पुनर्रचना करण्यास” सुरू केली आहे.
कुलेबा यांचे राजीनामा पत्र युक्रेनियन संसदेचे अध्यक्ष रुस्लान स्टेफानचुक यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे.
सर्व खासदार लवकरच या राजीनामा सत्रावर चर्चा करतील, असे अध्यक्षांनी सांगितले. सामान्यतः राजकीय औपचारिकता असलेल्या या राजीनाम्यांवर बुधवारनंतर मतदान होण्याची संसदेची अपेक्षा आहे.
रशिया युक्रेन युद्धसंघर्षाच्या निर्णायक टप्प्यावर, होणारे हे बदल सरकार बळकट करण्यासाठी आणि युक्रेनला आवश्यक असलेले परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक आहेत, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
“येणारा शरद ऋतू युक्रेनसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. आणि आपल्या सरकारची रचना अशी केली गेली पाहिजे जेणेकरून युक्रेन आपल्या सर्वांसाठी आवश्यक असलेले सर्व परिणाम साध्य करू शकेल “, असे झेलेन्स्की मंगळवारी म्हणाले.
युक्रेनच्या पूर्वेकडून रशियन सैन्य पुढे सरकत आहे, तर युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रदेशात धाडसी घुसखोरी करायला सुरूवात केली आहे. तिसरीकडे मॉस्कोने गेल्या काही आठवड्यांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत.
मागील आठवड्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की रशियाबरोबरचे युद्ध अखेरीस संवादाने संपण्याची आशा आहे. मात्र त्यासाठी कीव मजबूत स्थितीत असणे आवश्यक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या दोन संभाव्य उत्तराधिकाऱ्यांना ते लवकरच एक योजना सादर करणार आहेत.
एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना झेलेन्स्की यांनी सांगितले होते की रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनने तीन आठवड्यांपूर्वी केलेली घुसखोरी हा त्या योजनेचा एक भाग होता, पण त्यात आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांबरोबर इतर गोष्टींचाही समावेश होता.
झेलेन्स्की यांच्या पक्षाचे वरिष्ठ खासदार डेव्हिड अरखामिया यांनी मंगळवारी सांगितले की, एका ‘मोठ्या फेरबदलाद्वारे सरकारची पुनर्रचना’ केले जाईल, ज्यामध्ये निम्म्याहून अधिक मंत्री बदलण्यात येतील.
अनुकृती
(रॉयटर्स)