मॅक्रोन यांच्याकडून झेलेन्स्की यांना मदतीचे आश्वासन
दि. ०७ जून: ‘मिराज-२००० ही फ्रेंच लढाऊ विमाने लवकरच आम्हाला युक्रेनच्या आकाशात दिसतील,’ अशी अपेक्षा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर लष्करी मदतीचे आश्वासन दिल्याबद्दल झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष ईमॅन्युअल मॅक्रोन यांचे आभारही व्यक्त केले. दुसऱ्या महायुद्धाला निर्णायक कलाटणी देणाऱ्या ‘डी-डे’च्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते फ्रान्समधील नॉर्मंडी येथे आले होते.
रशियाच्या आक्रमणाविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून झुंजत असलेल्या युक्रेनला युरोपीय देशांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र, रशियाविरोधात लढण्यासाठी महत्त्वाची असलेली मदत त्यांच्याकडून अद्याप आम्हाला मिळाली नाही, असे सांगून झेलेन्स्की यांनी युरोपीय देशांच्या धोरणाविरुद्ध नाराजी आणि त्रागा व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर नॉर्मंडी येथे आलेल्या झेलेन्स्की यांनी मदतीबाबत मॅक्रोन यांच्याशी चर्चा केली. ‘फ्रान्स मिराज-२००० विमाने युक्रेनला देण्याचा विचार करीत आहे,’ असे मॅक्रोन यांनी झेलेन्स्की यांना सागितले. त्यावर ‘लवकरच ही विमाने आम्हाला युक्रेनच्या आकाशात दिसतील,’ अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिली. दुसऱ्या महायुद्धातही सहभागी असलेली ही विमाने ‘डी-डे’ वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सहभगी झली होती. त्याचा संदर्भ देऊन, ‘आत्ताच आपण पाहिलेली हे विमाने लवकरच आम्हाला युक्रेनच्या आकाशात दिसतील, असे झेलेन्स्की फ्रान्सच्या संसद सदस्यांशी बोलताना म्हणाले. ‘तुमची अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि त्या विमानाचे सारथ्य करणारे युक्रेनच्या हवाईदलातील वैमानिक यांची संयुक्त फौज आम्हाला धमकाविणाऱ्या राक्षापेक्षाही युरोप मजबूत आहे, हे सिद्ध करण्यास पुरेशी आहेत. ऐशी वर्षांपूर्वी युरोपने एकीचे बळ सिद्ध केले होते. आज आम्ही ते पुन्हा सिद्ध करून दाखवू,’ असे ते म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या कार्यक्रमात युक्रेनला साथ देण्याचे आणि रशियाच्या हुकुमशाहीसमोर न झुकण्याचे आवाहन पाश्चिमात्य देशांना केले. मॅक्रोन यांनीही ‘डी-डे’चा संदर्भ देताना युक्रेनला पाठींबा देण्यात युरोप कोणतीही कासार बाकी ठेवणार नाही, असे सांगितले. मात्र, युक्रेनला किती मिराज विमाने देणार, कधी देणार आणि त्याचे आर्थिक नियम काय असतील या बद्दल त्यांनी काहीच माहिती दिली नाही. या उन्हाळयापासून युक्रेनच्या वैमानिकांना फ्रान्समध्ये प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मॅक्रोन यांनी या प्रसंगी झेलेन्स्की यांच्यासमोर ठेवला. मात्र, युक्रेनला पाठींब्याबाबत फ्रान्समध्ये असलेला उत्साह कमी झाल्याचे चित्रही या वेळी फ्रान्सच्या संसदेत पाहायला मिळाले. मार्च २२ मध्ये झेलेन्स्की यांचे फ्रान्सच्या संसदेत भाषण झाले होते. त्यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान फ्रेंच संसद सदस्यांनी अनेकवेळा उभे राहून झेलेन्स्की यांना मानवंदना दिली होती. त्या तुलनेत या वेळी हे चित्र क्वचितच पाहायला मिळाले. ‘फ्रांसने दिलेले हे सहकार्य युक्रेन कधीही विसरणार नाही. हे युद्ध कधी संपेल हे सांगता येणार नाही, कारण सैतानाला कोणतीच सीमारेषा नसते. ऐंशी वर्षांपूर्वी नव्हती, आजही नाही. मात्र, पुतीन हे युद्ध जिंकू शकणार नाहीत कारण आपल्याला हरणे परवडणार नाही,, असे झेलेन्स्की त्यांच्या भाषणात म्हणाले.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)