रशियाशी सुमारे 29 महिने चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने पॅरिस गेम्समध्ये आपला सर्वात लहान राष्ट्रीय संघ पाठवला आहे. यानिमित्ताने आपल्या ऑलिम्पिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी युक्रेनने एका नवीन टपाल तिकीटाचे अनावरण केले.
पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत युक्रेनचे केवळ 140 खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या युक्रेनच्या इतिहासातील ही सर्वात कमी संख्या आहे.
या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 200हून अधिक देशांचे एकूण 10 हजार 500 खेळाडू सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे, परंतु यातील ठिकाणीकाही स्पर्धा 24 जुलैपासून सुरू होतील.
यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा आणि गेल्या 100 वर्षात पहिल्यांदाच केले जात आहे. पॅरिस हे मुख्य यजमान शहर असले तरी, फ्रान्स महानगरातील इतर 16 शहरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा एखाद्या बंदिस्त मैदानात होणार नाही. तर पॅरिस शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या आणि शहराची जान असणाऱ्या सीन नदीच्या किनाऱ्यावर उद्घाटन समारंभ होणार आहे.
पॅरिस 2024 ऑलिंपिक स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे खेळाच्या मैदानावर खेळाडूंमधील संख्यात्मक लिंग समानता साध्य करणारी ही इतिहासातील पहिली ऑलिम्पिक स्पर्धा असेल. आतापर्यंत आलेल्या बातम्यांनुसार, जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत समान संख्येने महिला आणि पुरुष खेळाडू सहभागी होणार आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा कीव शहराच्या मध्यभागी युक्रेनच्या ऑलिम्पिक टपाल तिकिटाचे अनावरण करण्यासाठी खेळाडू आणि अधिकाऱ्यांसमवेत जमलेल्या तलवारबाज व्लाडा खारकोव्हाने रॉयटर्सला सांगितले की, ‘आम्ही वीज, पाणी यांच्याशिवाय, अंधारात, थंडीत, उष्माघातामध्ये अगणित तास घालवले आहेत. मला वाटते की आम्ही सगळ्याच परिस्थितीवर मात केली आहे.”
खारकोव्हाच्या मते, “या परिस्थितीने आम्हाला बळकट केले असून आम्ही संपूर्ण जगाला हे दाखवण्यास तयार आहोत की सगळी परिस्थिती विपरीत असूनही आम्ही युक्रेनियन ठामपणे उभे आहोत आणि युक्रेनियन राष्ट्रासाठी आमच्यात एकजूट आहे.”
रशियाच्या आक्रमणात अनेक खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना लढाईतून पळून जाण्यास भाग पाडले आहे, क्रीडा सुविधांचे नुकसान झाले आहे. रशियन बॉम्बस्फोटांमुळे वारंवार दिले जाणारे हवाई हल्ल्याचे इशारे आणि वीजपुरवठा खंडित होणे यामुळे प्रशिक्षणात व्यत्यय येतो.
युक्रेनी क्रीडा मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाचे आक्रमण सुरू झाल्यापासून 479 खेळाडू आणि प्रशिक्षक मारले गेले आहेत. 15 ऑलिम्पिक प्रशिक्षण तळांसह 500 हून अधिक क्रीडा सुविधा नष्ट झाल्या आहेत.
सहा टपाल तिकिटांच्या संचाचे अनावरण करण्यात आले असून युक्रेनने यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये तलवारबाजी, ज्युडो, टेनिस, नौकानयन, भारोत्तोलन आणि नेमबाजी यांमध्ये जे पुरस्कार आणि पदके जिंकली आहेत त्या खेळांवर ही टपाल तिकीटे आधारित आहेत.
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर, रशिया आणि त्याचा सहकारी बेलारूसच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यावर बंदी घालावी, अशी शिफारस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) केली होती. मात्र त्यानंतर त्यांना तटस्थ म्हणून पॅरिस खेळांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी रशिया आणि बेलारूसच्या एकूण 25 खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे.
शांततापूर्ण, चांगले जग निर्माण करणे आणि एकजुटीच्या तसेच निष्पक्ष खेळाच्या भावनेने स्पर्धा कशी करावी याचा आपल्या पिढीसमोर आदर्श ठेवणे हे ऑलिम्पिकचे उद्दिष्ट आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)