जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांची टीका; ‘जी-७’मध्ये चर्चा नाही
दि. १५ जून: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी दिलेल्या शांतता प्रस्तावात गांभीर्याचा आणि प्रामाणिकपणाचा आभाव असल्याची टीका जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी केली आहे. या प्रस्तावात प्रामाणिकपणा नसल्यामुळेच इटलीतील ‘जी-७’ परिषदेत पुतीन यांच्या प्रस्तावावर चर्चाही झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘पुतीन यांनी दिलेल्या शांतता प्रस्तावावर चर्चा करण्यात एकाही ‘जी-७’ समूहातील नेत्याला स्वारस्य नव्हते, कारण पुतीन यांनी दिलेला प्रस्ताव प्रामाणिक नाही, हे सर्वांनाच माहिती आहे,’ असे शोल्झ यांनी इटलीतील ‘जी-७’ परिषद संपवून युक्रेन शिखर परिषदेसाठी जाताना विमानतळावर माध्यमाशी बोलताना सांगितले. ‘रशियाचा दावा असलेल्या चार प्रांतांवरील दावा सोडवा आणि ‘नाटो’चे सदस्यत्त्व स्वीकारू नये, या अटी पुतीन यांनी युद्ध थांबविण्यासाठी युक्रेनला घातल्या आहेत. मुळात पुतीन यांना हे युद्ध थांबवायचे नाही. युक्रेन शिखर परिषदेवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी तयंनी ही खेळी खेळली आहे,’ असे शोल्झ म्हणाले. पुतीन यांच्या मनात काय आहे आणि त्यांनी पाठविलेला प्रस्ताव किती प्रामाणिक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांचे काही वेगळेच उद्दिष्ट आहे, असे शोल्झ यांनी नमूद केले. ‘झेडईएफ टीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जी-७ ही औद्योगिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या पाश्चिमात्य देशांची संघटना आहे. या संघटनेची बैठक इटलीमध्ये सुरु होती. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की या बैठकीला हजर होते. युक्रेन शिखर परिषदेसाठी जी-७ समूहाचा पाठींबा मागण्यासाठी ते या परिषदेला आले होते. पुतीन यांनी शुक्रवारी युक्रेन विरोधात रशियाने पुकारलेले युद्ध थांबविण्यासाठी शतता प्रस्ताव दिला होता.
रशियावर युक्रेनबरोबरचे युद्ध थांबविण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने स्वित्झर्लंडमध्ये युक्रेन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांच्यासह जर्मनी, जपान, इटली, फ्रान्ससह ९० देशांचे नेते आणि आठ जागतिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मात्र, रशियाचा जवळचा सहकारी मनाला जाणारा चीन या परिषदेस उपस्थित राहणार नाही. त्यामुळे रशियाला जागतिक समुदायात एकटे पडण्याचे परिषदेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)