शांग्रीला डायलॉग: अधिकच्या शस्त्रपुरवठ्यासाठी झेलेन्स्की, मित्रदेशांचे प्रयत्न
दि. ०३ जून: रशियाच्या आक्रमणामुळे आणि प्रामुख्याने त्यांच्या तोफांच्या आणि हवाईदलाच्या हल्ल्यापासून स्वतःच्या मुलकी आणि लष्करी सुविधांचे आणि नागरिकांचे रक्षण, बचाव करण्यासाठी युक्रेनला अतिरिक्त शस्त्रपुरवठा आणि विशेषतः हवाई संरक्षण यंत्रणेची गरज आहे, असे मत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि युक्रेनच्या इतर मित्रदेशांकडून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर अतिरिक्त शस्त्र पुरविण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.
I addressed the Shangri-La Dialogue #SLD24 and stressed that the last few decades have seen diplomacy fail to achieve its tasks.
Ukraine has found a way to restore the force of diplomacy.
We propose peace through diplomacy: an inclusive and fair format, the Global Peace Summit. pic.twitter.com/ODUIBpjVe5
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 2, 2024
आशियातील महत्त्वाची सुरक्षा विषयक परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शांग्रीला डायलॉग’ला रविवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आश्चर्यकारकरित्या हजेरी लावली होती. या वेळी त्यांनी रशियाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी अधिकची शस्त्रे पुरविण्याचे आवाहन केले होते. तसेच, युरोपीय मित्रदेशांकडून देण्यात आलेली शस्त्रे रशियाच्या विरोधात वापरण्याची परवानगी मिळावी, अशी विनंतीही त्यांनी या परिषदेत केली होती. त्याला अनुसरून युक्रेनच्या मित्रदेशांनी अतिरिक्त शस्त्र पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे म्हटले जात आहे. ‘युक्रेन रशियाच्या आक्रमणाविरोधात गेली दोन वर्षे झुंज देत आहे. त्यातही गेल्या काही दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर नव्याने हवाईहल्ले सुरु करण्यात आले आहेत. हे हल्ले प्रामुख्याने युक्रेनच्या ईशान्येकडील खार्कीव्ह या शहराच्या परिसरात सुरु आहेत. त्यामुळे हे हल्ले परतवून लावण्यासाठी युक्रेनला अधिक तोफगोळ्यांची आणि शस्त्रास्त्र प्रणालीची गरज आहे. त्यातही प्रामुख्याने त्यांना जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज आहे,’ असे जर्मनीचे संरक्षणदलप्रमुख जनरल कारस्टेन ब्रयुर यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या लष्करातील निवृत्त मेजर जनरल माईक रायन यांनीही युक्रेनला हवाई संरक्षण यंत्रणेची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. रशियाकडून करण्यात येत असलेले क्षेपणास्त्र हल्ले आणि हवाईहल्ले पाहता युक्रेनला आघाडीवरील आपल्या लष्करी तुकड्यांच्या बचावासाठीच नव्हे, तर महत्त्वाची शहरे आणि पायाभूत सुविधांच्या रक्षणासाठीही त्यांच्याकडे असलेली यंत्रणा अधिक भक्कम करण्याची गरज आहे. अनेक कारणासाठी हवाई संरक्षण ही युक्रेनची महत्त्वाची गरज आहे, असे रायन यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या परिषदेला शनिवारी उपस्थिती लावली होती. रशियाविरोधातील युद्धासाठी अधिक पाठींबा मिळविण्यासाठी ते येथे आले होते. स्वित्झर्लंड येथे येत्या १५ व १६ जून रोजी होणाऱ्या शांतता शिखर परिषदेसाठी इतर देशांचा पाठींबा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या संघर्षातून काही मार्ग निघावा यासाठी मित्रदेशांनी युक्रेनच्या पाठीशी उभे राहावे, असे झेलेन्स्की यांचे प्रयत्न आहेत. रशियाने युक्रेनमधून माघार घ्यावी आणि युक्रेनच्या १९९१मध्ये ठरविलेल्या सीमा पूर्ववत कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन, इंडोनेशियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्राबोवो सुबिआनतो, अमेरिकी कॉंग्रेसचे प्रतिनिधीमंडळ, तिमोर-लेस्तेचे अध्यक्ष जोस रामोस-होर्ता आणि सिंगापूरच्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, या परिषदेत युक्रेनला देण्याच्या नव्या लष्करी मदतीबाबत कोणतेही आश्वासन झेलेन्स्की यांना मिळणे नसल्यचे समजते. ऑस्टिन यांनी अमेरिकेने युक्रेनला केलेल्या मदतीबाबत झेलेन्स्की यांना माहिती दिली आणि पुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले. तर, लिथुअनियाचे लष्कर युक्रेनला हवे असल्यास त्यांच्या लष्कराला प्रशिक्षण देईल, असे लिथुआनियाच्या पंतप्रधान इंग्रीडा सीमोनाईट यांनी सांगितले.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)