हमासने थायलंडच्या 5 नागरिकांसह, 8 बंधकांना मुक्त केले

0
हमासने
बंधकांच्या मुक्तीनंतर अर्बेल येहूद त्यांच्या कुटुंबीयांसह पुन्हा एकत्र आले. फोटो सौजन्य: IDF X page

19 जानेवारीपासून सुरू झालेल्या गाझा युद्धविरामामध्ये एक पाऊल पुढे टाकत, हमासने गुरुवारी आठ बंधकांची सुटका केली. तर दुसरीकडे इस्रायलने, या आठ बंधकांच्या बदल्यात 110 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. हमासने सुटका केलेल्या ओलीसांमध्ये 5 थायलंड नागरिकांचा देखील समावेश आहे.

याविषयीच्या तपशीलात नमूद केल्याप्रमाणे, इस्रायलच्या संरक्षण दलांनी X द्वारे जाहीर केले की, “482 दिवसांनंतर, गाझामधील हमास आणि इस्लामिक जिहाद दहशतवाद्यांनी बंदिवासात ठेवलेले 8 ओलिस अखेर इस्रायलला परत आले.”

देवाणघेवाणीच्या या टप्प्यामध्ये थायलंडच्या 5 नागरिकांसोबत, 3 इस्रायली नागरिकांनाही मुक्त केले गेले.

बंधकांच्या सुटकेसाठी विलंब

अहवालात नमूद केल्यानुसार, पॅलेस्टिनी लोकांच्या जमावाने बंधकांना घेरले आणि त्यांना रेड क्रॉसकडे वळवले. तेव्हापासून माजलेल्या अराजकतेमुळे बंधकांच्या सुटकेची प्रक्रिया उशीर झाली.

थेन्ना, साथियान, श्रियाओन, सेथाओ आणि रुम्नाओ अशी मुक्त झालेल्या पाच थायलंड नागरिकांची नावे आहेत.

तर आगम बर्जर नामक एक IDF सैनिकाला उत्तर गाझा येथून मुक्त करण्यात आले.

गुरुवारी झालेल्या या देवाणघेवाणीदरम्यान, मुक्त करण्यात आलेल्या इतर दोन इस्रायली बंधकांची ओळख पटली असून, गाड मोशे मोझेस आणि अर्बेल येहूद अशी त्यांची नावे आहे.

“जे बंधक इस्रायलला परतले आहेत त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो आणि गाझामध्ये अजूनही बंदिस्त असलेल्या आमच्या सर्व ओलिसांना परत आणण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे IDF ने X वर लिहिले.

दरम्यान अन्य काही कैद्यांची सुटका करताना गोंधळ उडाला, ज्यांचे नेतृत्व सशस्त्र सैनिकांनी जमावाद्वारे केले होते. त्यांच्यापैकी काही जणांनी आपल्या मोबाईल फोनद्वारे सुटकेच्या प्रक्रियेचे चित्रीकरण केले होते, जे कदाचित प्रसारित झाल्यामुळे बंधकांना अपेक्षित वाहनांमधून रेड क्रॉसकडे सोपवण्यापूर्वी गोंधळ उडाल्याचे, वृत्त बीबीसीने दिले.

सुटकेपूर्वी इस्रायलने हमासचे माजी नेते- याह्या सिनवार यांच्या घरासमोर बॉम्बफेक केल्याचे समजते. सिनवार हे 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे प्रमुख शिल्पकार असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी रफाहमध्ये इस्रायली सैन्याने त्यांना ठार केले होते.

हँडओव्हर दरम्यान गोंधळ

बंधकांची हस्तांतरण प्रक्रिया कव्हर करणाऱ्या एका पत्रकाराने BBC वृत्तसंस्थेला सांगितले, की “हँडओव्हर करतेवेळी तेथे खूप गोंधळ उडाला होता, बरीच धक्काबुक्की देखील झाली.”

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या गोंधळाचे वर्णन ‘धक्कादायक दृश्ये’ असे केले.

‘ओलीसांच्या सुटकेदरम्यान अशा दृश्यांची पुनरावृत्ती होणार नाही’, असे आश्वासन मिळेपर्यंत इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास विलंब केला होता.

कैद्यांच्या सुटकेदरम्यान उडालेला गोंधळ, हा इस्रायल आणि हमास यांच्यातल्या नाजूक युद्धविराम करारातील एक नवीन अडचण होती. या कराराने 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यापासून सुरू असलेले युद्ध थांबवले होते.

हमासने 251 लोकांना ओलीस ठेवले होते आणि हल्ल्यांदरम्यान सुमारे 1200 लोक मारले होते, ज्यामुळे इस्रायलने गाझामध्ये आपली कारवाई सुरू केली होती.

19 जानेवारीपासून युद्धविराम सुरू झाल्यापासून हमासने आतापर्यंत 15 ओलिसांची सुटका केली आहे.

(IBNS च्या इनपुटसह)

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here