युक्रेनचा मॉस्कोवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला

0

कुर्स्कमध्ये मिळालेल्या यशामुळे उत्साहित झालेल्या युक्रेनने मॉस्कोवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला सुरू केला आहे. बुधवारी झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांचा फटका शहराला बसल्याचे महापौरांनी सांगितले, रशियन हवाई संरक्षण तुकड्यांनी राजधानीच्या दिशेने उडत येणारे किमान 10 ड्रोन नष्ट केले.
पोडोल्स्क शहराच्या दिशेने येणारे काही ड्रोन नष्ट करण्यात आले, असे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी सांगितले. मॉस्को प्रदेशातील हे शहर क्रेमलिनच्या दक्षिणेस सुमारे 38 किमी (24 मैल) अंतरावर आहे.
“संरक्षण मंत्रालयाच्या हवाई संरक्षण प्रणालीने शत्रूच्या यूएव्ही (मानवरहित हवाई वाहने) हल्ल्यांना मागे हटवले जात आहे,” असे सोब्यनिन यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर पहाटे 4ः43 वाजता (0443 जी. एम. टी.) सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यांनंतर कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाली नसल्याचेही ते म्हणाले.
अलिकडच्या काही महिन्यांत युक्रेनने अनेकदा मॉस्कोला लक्ष्य करत एक किंवा दोन ड्रोन सोडले आहेत, ज्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. मात्र बुधवारी करण्यात आलेला हल्ला मे 2023च्या हल्ल्यापेक्षा मोठा असल्याचे मानले जात आहे. मे 2023 मध्ये राजधानीवर झालेल्या हल्ल्यात किमान आठ ड्रोन नष्ट करण्यात आले होते. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या म्हणण्यानुसार कीवचा रशियाला घाबरवण्याचा आणि चिथावण्याचा प्रयत्न होता.
अर्थात हा किती मोठा हल्ला होता हे रशियाने उघड केलेले नाही कारण रशियन अधिकारी त्यांच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी नष्ट केलेल्याच ड्रोनची केवळ नोंद करतात.
जोपर्यंत निवासी किंवा नागरी भागातील पायाभूत सुविधांचे नुकसान होत नाही किंवा नागरिकांचा मृत्यू होत नाही तोपर्यंत युक्रेन आणि रशिया दोघेही त्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानाची संपूर्ण व्याप्ती क्वचितच उघड करतात.
रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी मॉस्कोवर झालेला हल्ला हा युक्रेनने रशियावर केलेल्या व्यापक ड्रोन हल्ल्याचा एक भाग होता, ज्यात हवाई संरक्षण प्रणालीने केवळ सीमावर्ती ब्रायन्स्क प्रदेशावरील 18 ड्रोन तर इतर प्रदेशांवरील काही स्वतंत्र ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट केली.
रशियाच्या नैऋत्य भागातील ब्रायन्स्क सीमेवरील हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची नोंद नाही, असे या प्रदेशाचे राज्यपाल अलेक्झांडर बोगोमाझ यांनी टेलिग्रामवर लिहिले.
रशियाच्या आरआयए राज्य वृत्तसंस्थेने असेही सांगितले की, उत्तरेकडे मॉस्को प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या तुला प्रदेशातही दोन ड्रोन नष्ट करण्यात आले.
अलीकडच्या काही महिन्यांत, मॉस्कोच्या युद्धनीतीची गुरुकिल्ली असलेल्या पायाभूत सुविधा नष्ट करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत युक्रेनने रशियन प्रदेशावरील हवाई हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या भूभागावर याआधीच्या काळात रशियाने सातत्याने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले होत असल्याचेही त्यात म्हटले आहे.
सध्या ड्रोन ही अशी प्रणाली बनली आहे जी युद्धात अधिकाधिक वापरली जात आहे. स्वस्त आणि प्रतिस्पर्ध्याच्या प्रदेशात खोलवर प्रवेश करण्यास ही प्रणाली सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र कोणत्याही भू-युद्धावर त्यांचा निर्णायक प्रभाव पडल्याच्या बातम्या अद्याप ऐकण्यात आलेल्या नाहीत.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleBrazilian And Indian Naval Chiefs Discuss Cooperation And Training
Next articleRussia Advances In Donetsk Even As Ukraine’s Kursk Offensive Stalls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here