युक्रेनला अखेर त्यांच्या देशात रशियाची आगेकूच थांबवण्यासाठी आवश्यक लष्करी साधनसामग्री मिळाली आहे. अमेरिकन कॉंग्रेसने कोट्यवधी डॉलर्सची लष्करी मदत रोखून धरल्याने युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय रशियाला युद्धात आपली आघाडी कायम ठेवता आली आहे.
युक्रेनच्या मदत पॅकेजला विलंब
गेल्या महिन्यात काँग्रेसने मंजूर केलेल्या 61 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजमुळे, युक्रेनच्या बंदूकांना आवश्यक असणाऱ्या गोळ्यांचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे रशियनांचे हल्ले परतवून लावण्यासाठी आपल्याकडे आता सामुग्री आहे हे लक्षात घेऊन युक्रेनियन सैनिक आता कोणत्याही दडपणाविना होवित्झर चालवू शकतात.
खार्किवच्या उत्तरेकडील जिल्ह्यात लढणाऱ्या युक्रेनियन सैनिकांच्या मते, बख्मुतमधील लढाईपेक्षा तिथली लढाई अधिक तीव्र आहे. बख्मुत हे पूर्व युक्रेनमधील एक शहर आहे जे गेल्या वर्षी रशियाने ताब्यात घेतले होते आणि कित्येक महिन्यांच्या लढाईमुळे ते ढिगाऱ्याखाली दबले गेले.
युक्रेनच्या 92व्या सेपरेट असॉल्ट ब्रिगेडचा गनर पावलो याच्या मते इथली लढाई अधिक “तीव्र” आहे. “आम्ही आधी बख्मुत भागात तैनात होतो, आता आमची येथे बदली करण्यात आली आहे. इथे खूप ‘गरम’ आहे. (रशिया युक्रेन युद्ध अधिक तीव्र आहे) आमच्याकडे तिथे लढण्यासाठी गोळे नव्हते. येथे, किमान आमच्याकडे गोळे आहेत, त्यांनी ते वितरीत करण्यास सुरुवात केली. आमच्याकडे युद्ध करण्यासाठी, लढण्यासाठी काहीतरी आहे.”
रशियाची आगेकूच
रशियन सैन्याने या महिन्याच्या सुरुवातीला सीमारेषा ओलांडली आणि सुमारे डझनभर गावे ताब्यात घेतल्याचे म्हटले जाते. सीमेच्या आत पाच किलोमीटर (तीन मैल) अंतरावर असलेले वोव्हचान्स्क शहर सध्या हल्ल्याचा केंद्रबिंदू आहे.
युक्रेनच्या सैन्याचे या शहरावर सुमारे 60 टक्के नियंत्रण आहे आणि रशियन हल्ले रोखण्यासाठी ते जीवाची बाजी लावून लढत आहेत. लष्करी विश्लेषकांच्या मते, हल्ला सुरू केल्यापासून वोव्हचान्स्क ताब्यात घेणे यात रशियाचा सर्वात मोठा फायदा असेल. कारण तिथून खार्किव फक्त 70 किमी अंतरावर आहे.
रेषेवरील नियंत्रण कायम ठेवणे
ब्रिगेडच्या तोफखाना युनिटचे कमांडर विटाली म्हणतात की, युक्रेनियन लोकांना खात्री आहे की आता गोळ्यांचा पुरवठा होत राहिल. येथे प्रत्येकाला रेषेवरील नियंत्रण कायम ठेवण्याचे महत्त्व माहित आहे. ते एका “मोठ्या आणि गंभीर शत्रू गटाच्या” विरोधात उभे असताना आता अधिक कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे ते पुढे म्हणाले.
“जर आपण आता हे दाखवून देऊ शकलो की अशा टोकाच्या परिस्थितीतही आपण खार्किव आणि खार्किवच्या आजूबाजूच्या प्रदेशावर होणारा शत्रूचा मोठा हल्ला थोपवू शकतो, तर शत्रू कीव्ह, चेर्निहिव्ह, सुमी किंवा पोल्टावा प्रदेशावर हल्ला करण्याचा विचार करण्याचे धाडस करणार नाही.”
अश्विन अहमद
(रॉयटर्स)