जगभरातील 370 दशलक्षांहून अधिक मुली आणि महिला, किंवा जगभरातील दर आठ महिलांपैकी एकजण, वयाच्या 18 व्या वर्षांपूर्वीच बलात्कार किंवा लैंगिक छळाला बळी पडत असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या बाल संस्थेने (युनिसेफ) बुधवारी केला.
संपर्करहित हिंसाचाराचे प्रकार लक्षात घेता ही संख्या 650 दशलक्ष किंवा पाचपैकी एक महिला असे वाढते. यामध्ये ऑनलाइन किंवा शाब्दिक गैरवर्तनाचा समावेश आहे, असे युनिसेफने या समस्येच्या पहिल्या जागतिक सर्वेक्षणात म्हटले आहे.
मुलेही लैंगिक अत्याचाराचे बळी
सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, मुली आणि महिलांना लैंगिक अत्याचारांचा सर्वात जास्त त्रास होत असला तरी, 240 ते 310 दशलक्ष मुले आणि पुरुष किंवा 11 पैकी 1 मुलाने बालपणी बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराचा अनुभव घेतलेला असतो.
“यात मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे प्रमाण प्रचंड आहे आणि यामुळे लागणारा कलंक, मोजमापातील आव्हाने आणि माहिती संकलनातील मर्यादित गुंतवणूक यामुळे याचा आवाका पूर्णपणे समजणे कठीण आहे,” असे युनिसेफने अहवाल प्रसिद्ध करताना म्हटले आहे.
पुढील महिन्यात कोलंबियामध्ये ‘मुलांवरील हिंसाचार समाप्त करणे’ या विषयावरील जागतिक मंत्रीस्तरीय परिषदेचे उद्घाटन होण्याअगोदर हा अहवाल सादर झाला आहे.
युनिसेफच्या मते, त्यांनी काढलेले निष्कर्ष कायदे मजबूत करणे, लैंगिक हिंसाचार ओळखणे, पीडितांना तक्रार करण्यास मदत करणे यासह तीव्र जागतिक कारवाईची तातडीची गरज आहे.
लैंगिक अत्याचारांना सीमेचे बंधन नाही.
लैंगिक हिंसाचाराला भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सीमांचे बंधन नसते, असे युनिसेफने म्हटले आहे. मात्र उप-सहारा आफ्रिकेत पीडितांची सर्वाधिक संख्या आहे, ज्यात 79 दशलक्ष मुली आणि महिला किंवा टक्केवारीनुसार हे प्रमाण 22 टक्के आहे. 75 दशलक्ष किंवा 8 टक्के पीडित पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियात आहे.
महिला आणि मुलींच्या केलेल्या सर्वेक्षणावर युनिसेफच्या अंदाजानुसार मध्य आणि दक्षिण आशियामध्ये 73 दशलक्ष किंवा 9 टक्के पीडित असून युरोप आणि उत्तर अमेरिकेत 68 दशलक्ष किंवा 14 टक्के, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन येथे 45 दशलक्ष किंवा 18 टक्के तर 29 दशलक्ष किंवा 15 टक्के मुली किंवा महिला उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये अत्याचाराला बळी पडल्या आहेत.
नाजूक परिस्थितीतील मुली सर्वाधिक प्रभावित
“नाजूक परिस्थिती” मध्ये जोखीम जास्त होती. 4 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती लैंगिक शोषणाची बळी ठरली आहे. या परिस्थितीमध्ये कमकुवत संस्था, संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षक दल किंवा मोठ्या संख्येने निर्वासितांचा समावेश आहे, असे अहवालात आढळून आले आहे.
युनिसेफच्या कार्यकारी संचालिका कॅथरीन रसेल यांनी मुलांवरील हिंसाचार हा “आपल्या नैतिक विवेकावर एक डाग” असल्याचे म्हटले आहे.
“हे अत्याचार खोल आणि कायमस्वरूपी आघात देणारे असतात. बहुतेकदा ओळखीच्या आणि विश्वास ठेवता येणाऱ्या व्यक्तीकडून – खरंतर जिथे त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे अशांकडूनच – असे अत्याचार केले जातात.”
विविध रोगांची लागण होण्याचा मोठा धोका
युनिसेफने म्हटले आहे की बालपणातील बहुतेक हिंसाचार पौगंडावस्थेत, विशेषतः 14 ते 17 वर्षांच्या काळात होतात आणि ज्यांना याचा त्रास होतो त्यांना संक्रमित रोग, मादक पदार्थांचा गैरवापर आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका जास्त असतो.
“जेव्हा मुले त्यांचे अनुभव उघड करण्यास उशीर करतात किंवा त्यांच्याशी केले गेलेले गैरवर्तन पूर्णपणे लपवून ठेवतात तेव्हा त्याचा प्रभाव आणखी वाढतो,” असे युनिसेफने म्हटले आहे.
त्यात म्हटले आहे की, विशेषतः मुलांच्या समस्येचा संपूर्ण आवाका जाणून घेण्यासाठी माहिती संकलनात वाढीव गुंतवणुकीची आवश्यकता आहे.
युनिसेफने म्हटले आहे की हा अभ्यास अंदाजे 2010 ते 2022 या काळात 120 देश आणि विविध देशांमधील मुलींच्या आणि महिलांच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सर्वेक्षणांवर आधारित आहे. मुले आणि पुरुषांसाठीची माहिती स्त्रोतांच्या विस्तृत श्रेणीतून घेतले गेली होती आणि त्यात काही अप्रत्यक्ष अभ्यासपद्धती लागू केल्या गेल्या होत्या.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स