केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (19 मार्च) जम्मू येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) 83वा स्थापना दिन साजरा झाला. यावेळी पहिल्यांदाच सीआरपीएफचा स्थापना दिन समारंभ दिल्लीबाहेर साजरा केला गेला. यावेळी, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशातील सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांची वार्षिक पथसंचलने देशाच्या विविध भागांत आयोजित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली. सीआरपीएफच्या सर्व संस्था देशाच्या सीमाभागात आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असतात. त्यामुळे त्यांनी देशाच्या विविध भागांत जायला हवे आणि स्थानिक लोकांशी त्यांनी सौहार्दाचे संबंध निर्माण करायला हवेत. तसेच त्या-त्या प्रदेशातील लोकांची त्यांना माहिती असायला हवी, हाच विचार करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. या निर्णयाचाच भाग म्हणून सीआरपीएफचे वार्षिक पथसंचलन जम्मू या ऐतिहासिक शहरात करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमध्येच पंडित प्रेमनाथ डोगरा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असल्याचे सांगत, एकाच देशात दोन प्रधान, दोन विधान (संविधान) आणि दोन निशाण (राष्ट्रध्वज) अस्तित्वात राहू शकत नाहीत, यासाठी आंदोलन केले. त्या दोघांनी जम्मू काश्मीरसाठी पाहिलेले स्वप्न, ‘एक प्रधान, एक राष्ट्रध्वज आणि एक विधान’ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले आहे, असे शाह म्हणाले.
देशाला आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला स्वत:पेक्षा महत्व आणि प्राधान्य देण्याची परंपरा सीआरपीएफने कायम ठेवली आहे, असे गौरवोद्गार अमित शाह यांनी काढले. देशातील युवा पिढीला देखील या जवानांचे समर्पण आणि त्यागाविषयी मोठा आदर आहे. जिथे कुठेही संकटाची परिस्थिती असते आणि तिथे सीआरपीएफचे जवान पोहोचतात, तेव्हा, लोकांना पूर्ण विश्वास वाटतो की, आता ते परिस्थिती नियंत्रणात आणतील. या दलांचे कित्येक वर्षांचे परिश्रम आणि त्यांचा गौरवास्पद इतिहास यातूनच त्यांच्याविषयी हा विश्वास निर्माण झाला आहे, असे अमित शाह म्हणाले. नक्षलग्रस्त भाग असो किंवा मग कश्मीरमधला पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद असो, किंवा मग ईशान्य भागात अशांतता निर्माण करणाऱ्या शक्ती असोत, या सगळ्या संकटांच्या वेळी, सीआरपीएफने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे ते म्हणाले.
देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच दिवशी, 1950 साली, सीआरपीएफला आपला ध्वज दिला होता. आज सीआरपीएफ देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असून त्यात 246 तुकड्या आणि 3.25 लाख सैनिक आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेसाठी ते केवळ देशातच नाही, तर जगभरातील सर्व लष्करी दलांमध्ये ओळखले जातात, असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.

The Union Home and Cooperation Minister, Shri Amit Shah reviews the security situation in Jammu and Kashmir, in Jammu on March 19, 2022.
दहशतवाद्यांविरोधात आक्रमक व्हा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू इथे, जम्मू तसेच काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. येथील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाल्याबद्दल, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाई करत, त्यांना सुरक्षित आश्रय किंवा आर्थिक मदत मिळणार नाही, अशी व्यवस्था करण्यावर अमित शाह यांनी भर दिला. दहशतवादविरोधी कारवाया अधिक प्रभावीपणे राबवल्या जाण्यासाठी सुरक्षारक्षक आणि पोलीस यांच्यात सदैव समन्वय असायला हवा, जेणेकरुन सुरक्षा दले दहशतवादविरोधी मोहिमा प्रभावीपणे राबवू शकतील. तसेच, जम्मू-काश्मीरमधील अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाला अधिक मजबूत करत, अंमलीपदार्थांच्या तस्करीचे सर्व मार्ग बंद करावेत, असे अमित शाह यांनी सांगितले. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी संपूर्णपणे थांबवण्यासाठी, इथले सुरक्षा जाळे अधिक मजबूत करावे, अशी सूचना त्यांनी केली.