परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत तत्कालीन यूपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हैदराबाद येथे ‘फॉरेन पॉलिसी द इंडिया वेः फ्रॉम डिफायन्स टू कॉन्फिडन्स’ या विषयावरील चर्चासत्राला संबोधित करताना परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी दावा केला की, 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा स्पष्टपणे सहभाग होता हे तपासात समजल्यानंतरही तत्कालीन सरकारने त्याच्याविरुद्ध काहीही न करण्याचा निर्णय घेतला. “पाकिस्तानवर हल्ला न करण्यापेक्षा, त्याच्यावर हल्ला करणे अधिक महागात पडेल,” असा काहीसा त्यांचा तर्क होता, असे जयशंकर पुढे म्हणाले.
आपल्या भाषणात जयशंकर यांनी भारताचे वर्णन जागतिक दक्षिण (ग्लोबल साऊथ) देशांचा आवाज म्हणून केले. ते म्हणाले की, आज ग्लोबल साऊथमधील सुमारे 125 देश भारताकडे आशेने पाहतात आणि जगातील त्यांच्या समस्यांबाबत आमच्यावर विश्वास ठेवतात. ते पुढे म्हणाले की, इस्रायलसारखा देश, जो 1948 मध्ये स्वतंत्र झाला, परंतु 1992 पर्यंत तिथे भारतीय दूतावास नव्हता. इतकेच नाही इस्रायलला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. विरोधी पक्षांवर निशाणा साधत जयशंकर म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मतपेट्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडला आहे.
यावेळी परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर म्हणाले की, क्षणाक्षणाला बदलत असणाऱ्या जगासाठी आपण नेहमीच तयार राहिले पाहिजे. एक असे जग जिथे अनेकदा गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. अगदी कमीत कमी वेळेत प्रतिसाद देण्याची आपल्यात सतत क्षमता असणे आवश्यक आहे. सध्या सीमेवर विविध आव्हाने आहेत. असे असूनही आपल्याला आपल्या सीमा आणखी मजबूत करायच्या आहेत. यासाठी आपल्याला खूप गृहपाठ करावा लागतो. आम्हाला लष्कराच्या पाठिंब्याची गरज आहे. तशीच गरज सीमेवरील धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला लष्कराला पाठिंबा देण्याची आहे, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
आज सुमारे दोन कोटी भारतीय, कामानिमित्त भारताबाहेर रहातात किंवा परदेशात स्थायिक झाले आहेत. इतर देशांचे सुमारे 15 कोटी नागरिक आहेत ज्यांच्याशी आम्ही अनेकदा संपर्कात असतो. ते आपल्याला किती जबाबदारी देते ते पहा. युक्रेन, सुदान, इस्रायलमधील संघर्षांमध्ये आपण हे पाहिले आहे. मोदींची हमी केवळ भारताच्या सीमेवरच थांबत नाही. मोदींची हमी जागतिक आहे, असेही जयशंकर म्हणाले.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)