शाग्रीला डायलॉग: आशियाची सुरक्षा प्राधान्यक्रमाचा विषय
दि. ०१ जून: ‘आशिया सुरक्षित असेल तरच अमेरिकेचेही भवितव्य सुरक्षित राहील, त्यामुळे आशियाची सुरक्षा अमेरिकेच्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे,’ असे प्रतिपादन अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी शनिवारी ‘शांग्रीला डायलॉग’मध्ये केलेल्या भाषणात केले. या वेळी चीनचा थेट उल्लेख टाळताना ऑस्टिन यांनी हिद-प्रशांत क्षेत्र आणि आशियातील सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. ऑस्टिन यांच्या या विधानामुळे युक्रेन आणि गाझाच्या संघर्षात गुंतलेल्या अमेरिकेचा ‘फोकस’ पुन्हा चीनकडे वळल्याचे मत प्रदर्शित होत आहे.
रशियाचा युक्रेनवरील हल्ला आणि इस्त्राईल-हमास यांच्यात गाझात सुरु असलेला संघर्ष या मुळे अमेरिकी परराष्ट्र धोरण आणि संरक्षण यंत्रणा या भागात गुंतली होती. मात्र, पुन्हा हिंद-प्रशांत आणि आशियात लक्ष केंद्रित करण्याचे अमेरिकेने ठरविले असल्याचे ऑस्टिन यांच्या विधानावरून सिद्ध होते. ‘युरोप आणि मध्य आशियात हा ऐतिहासिक संघर्ष सुरु असला, तरी हिद-प्रशांत आणि आशिया हा कायमच अमेरिकेच्या प्राधान्यक्रमाचा विषय राहिला आहे आणि आशिया सुरक्षित असेल, तरच अमेरिकेचेही भवितव्य सुरक्षित राहील, त्यामुळे अमेरिकेने या क्षेत्रात अद्यापही आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. आशियातील सुरक्षाविषयक आव्हानातून कोणाला शिक्षा अथवा धाकदपटशा दाखवून नव्हे, तर शांतता आणि संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्याची अमेरिकेची इच्छा आहे,’ असे सांगताना ऑस्टिन यांनी चीनला चिमटा घेतला. त्यांचे हे विधान म्हणजे बायडेन प्रशासनाच्या आशिया विषयक धोरणाचा परिपाक मनाला जात आहे. ऑस्टिन यांनी या परिषदेच्या पूर्वसंध्येला चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली होती. चीनच्या तैवानविषयक भूमिकेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या वरून उभय संरक्षणमंत्र्यांत शाब्दिक चकमकही उडाली होती.
ऑस्टिन यांच्या भाषणाचा प्रतिवाद करताना चीनच्या सेन्ट्रल मिलिटरी कमिशनच्या जॉइंट स्टाफ डिपार्टमेंटचे उपप्रमुख व पीपल्स लिबरेशन आर्मीचे लेफ्टनंट जनरल जिंग जिआनफेंग यांनी अमेरिकेवर टीका केली. ‘अमेरिकेचे हिंद-प्रशांत क्षेत्राबाबतचे धोरण नेहमीच संघर्षाला चिथावणी देणारे, फुट पाडणारे आणि स्थैर्याला कमी महत्त्व देणारे राहिले आहे. त्यांना फक्त स्वतःचे स्वार्थी भूराजकीय हित जपायचे आहे. अमेरिकेचे हे धोरण या क्षेत्रातील देशांच्या शांतता, समृद्धी आणि परस्पर सहकार्याबाबतच्या आशा, आकांक्षाच्या विपरीत आहे,’ असे ते म्हणाले.
या परिषदेत इंडोनेशियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रबोवो सुबिआन्तो यांनी गाझामध्ये गरज पडल्यास शांतीसेना पाठविण्याची आपल्या देशाची तयारी आहे, असे स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी या भागात शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी दिलेला तीन टप्प्यातील प्रस्ताव त्यादृष्टीने उचललेले एक योग्य पाऊल आहे, असे ते म्हणाले. तर, एका वेगळ्या सत्रात दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री शिन वोन-सिक यांनी युद्धग्रस्त देशांना शस्त्रपुरवठ्यावर बंदी आणणारा दक्षिण कोरियातील कायद्याबाबत कोणतेही विधान करण्यास नकार दिला. फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी दक्षिण चीन समुद्रात चीनकडून सुरु असलेल्या आक्रमणाचा निषेध केला होता. त्याला अनुसरून ऑस्टिन यांनी फिलिपिन्सने सहन केलेला छळ धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनची वाढती दादागिरी रोखण्यासाठी अमेरिकी कॉंग्रेसने आठ अब्ज डॉलरची तरतूद केली आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)