बुधवारी अमेरिकचे एक लष्करी विमान, 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमृतसरमध्ये उतरल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याच्या एक आठवड्याआधी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन अजेंडाचा हा एक भाग होता.
गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून, भारत आणि अमेरिकेच्या विविध धोरणांपैकी ‘स्थलांतर’ हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि मोदींसोबतच्या भेटीदरम्यान यावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना, पूर्वीच्या यूएस प्रशासनाने हद्दपार केले असले तरी, वॉशिंग्टनने पहिल्यांदाच लष्करी विमानाचा वापर करुन त्यांना मायदेशी पाठवले. लष्करी विमानाचा वापर करून अशा प्रकारच्या उड्डाणांसाठी हे आतापर्यंतचे सर्वात दूरचे गंतव्यस्थान आहे.
बेकायदेशीर स्थलांतरित
अमेरिकेचे जे विमान अमृतसरमध्ये उतरले होते, त्यामध्ये 104 भारतीय स्थलांतरितांचा समावेश होता, असे पंजाबचे नॉन-रेसिडंट इंडियन अफेअर्स मंत्री- कुलदीप सिंग ढिल्लों यांनी सांगितले.
पंजाब पोलिसांनी सांगितले की, यापैकी प्रत्येकी 33 स्थलांतरित गुजरात आणि हरयाणामधून होते, तर 30 पंजाबमधून होते. त्या सर्वांची विमानतळावर काही तास तपासणी केली गेली आणि नंतर पोलिसांचे काही गट त्यांना शासकीय वाहनातून तिथून घेऊन गेले.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही.
स्थलांतरितांना निर्वासित करण्यासाठी लष्करी विमानांचा वापर करून आणि त्यांना राहण्यासाठी लष्करी तळ उपलब्ध करुन देऊन, ट्रम्प प्रशासनाने आपला इमिग्रेशन अजेंडा पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘स्थलांतरितांना घेऊन आलेले ‘सी -17′ हे विमान, भारताकडे यायला निघाले मात्र ते तब्बल 24 तासांनी भारतात पोहचणार होते. विमान सार्वजनिक ट्रॅकर्सवर न दिसल्यामुळे काहीकाळ चिंता वाढली होती, पण स्थानिक मिडियाने रिपोर्ट केले की, ते सॅन अँटोनियो, टेक्सासमधून येत असल्यामुळे, त्याला अधिक वेळ लागू शकतो.’
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, यांनी गेल्या महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांची भेट घेतली. तेव्हा “अनियमित स्थलांतराशी संबंधित चिंता” दूर करण्यासाठी, भारतासोबत काम करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या इच्छेवर त्यांनी विशेष जोर दिला.
भारत-अमेरिका संबंध
दरम्यान, अमृतसरमध्ये दाखल झालेल्या सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांच्या तपशीलांची पडताळणी केल्यानंतरच, त्यांना परत घेतले जाईल, असा निर्णय नवी दिल्लीने घेतला आहे.
अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून, चीनचा सामना करण्यासाठी सध्या दोन्ही देश सखोल धोरणात्मक संबंध प्रस्थापित करत आहेत.
आपल्या नागरिकांना ‘कुशल कामगार व्हिसा’ मिळणे सोपे व्हावे, यासाठी भारत अमेरिकेसोबत आवश्यक करार करण्यासाठी देखील उत्सुक आहे.
पेंटागॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की यूएस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या 5,000 हून अधिक स्थलांतरितांना निर्वासित करण्याची योजना आखली आहे तर रॉयटर्सने गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालानुसार, ग्वाटेमालाला जाणाऱ्या फ्लाइटची किंमत प्रति स्थलांतरित किमान $4,675 डॉलर्स इतकी आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)