अमेरिकन नौदलाने केली तैवान सामुद्रधुनी पार, चीनचा इशारा

0

 

गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या आठवड्यात दोन अमेरिकन नौदलाच्या जहाजांनी संवेदनशील अशा तैवान सामुद्रधुनीतून प्रवास केला. अशा पहिल्या मिशनमुळे चीनकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून या मिशनमुळे सुरक्षाविषयक धोके वाढल्याचे त्याने म्हटले आहे.

जलप्रवासाचे स्वातंत्र्य

अमेरिकन नौदल अधूनमधून मित्र देशांच्या जहाजांसोबत महिन्यातून एकदा या सामुद्रधुनीतून प्रवास करते. तैवान हा आपला स्वतःचा प्रदेश असल्याचा दावा करणाऱ्या चीनचे म्हणणे आहे की, व्यूहात्मक दृष्टीने जलमार्ग त्यांचाच आहे.

अमेरिकन नौदलाने सांगितले की या जहाजांपैकी अर्ले बर्क-श्रेणीचे मार्गदर्शित-क्षेपणास्त्र विनाशक USS राल्फ जॉन्सन आणि पाथफाइंडर-श्रेणी सर्वेक्षण जहाज, USNS बोडीच आहेत. या जहाजांनी 10-12 फेब्रुवारी रोजी उत्तर-दक्षिण असा प्रवास केल्याचे त्यात म्हटले आहे.

“तैवान सामुद्रधुनीमधील एका कॉरिडॉरमधून हा प्रवास झाला जो कोणत्याही किनारी राज्याच्या प्रादेशिक समुद्राच्या पलीकडे आहे,” असे नेव्ही कमांडर मॅथ्यू कमर यांनी सांगितले,  जे अमेरिकन सैन्याच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रवक्ते आहेत. “या कॉरिडॉरमध्ये सर्व राष्ट्रे या स्वातंत्र्यांशी संबंधित समुद्रातील जलवाहतूक, ओव्हरफ्लाईट आणि इतर आंतरराष्ट्रीय कायदेशीर वापराचे समुद्राशी संबंधित स्वातंत्र्य उपभोगतात.”

या सगळ्या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी चीनकडून सैन्य पाठवण्यात आल्याचे चीनच्या लष्कराने सांगितले.

चीनची प्रतिक्रिया

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ईस्टर्न थिएटर कमांडने बुधवारी सकाळी एका निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिका अशा कृतीतून चुकीचे सिग्नल पाठवते आणि सुरक्षाविषयक धोके वाढवते.”

चीन तैवानला आपला सर्वात महत्त्वाचा राजनैतिक मुद्दा मानतो आणि तो चीन-अमेरिका संबंधांमध्ये नियमितपणे अडथळा बनत असतो.

ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यात या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात चीनच्या “नकारात्मक” संदर्भाबद्दल त्याने जपानकडे आपला निषेध  नोंदवला होता.

त्या निवेदनात “तैवान सामुद्रधुनी ओलांडून शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी” आणि “आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये तैवानच्या अर्थपूर्ण सहभागासाठी” समर्थन व्यक्त करण्यात आले होते.

बुधवारी बीजिंगमध्ये अमेरिकन युद्धनौकांबद्दल विचारले असता, चीनच्या तैवान अफेयर्स ऑफिसच्या प्रवक्त्या झू फेंगलियन म्हणाल्या की तैवान हे देशाचे “मुख्य हित” आहे आणि अमेरिकेने सावधगिरीने वागले पाहिजे.

“आम्ही याला ठामपणे विरोध करत आहोत आणि कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला कधीही परवानगी देणार नाही. देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता टिकवून ठेवण्याची आमची दृढ इच्छा, पूर्ण आत्मविश्वास आणि क्षमता आहे,” असे त्या म्हणाल्या.

तैवानचा पवित्रा

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांच्या सैन्याने देखील लक्ष ठेवले होते मात्र “परिस्थिती सामान्य होती” असेही त्यांनी नमूद केले.

सामुद्रधुनीतील अमेरिकन नौदलाचे शेवटचे सार्वजनिकरित्या कबूल केलेले मिशन नोव्हेंबरच्या उत्तरार्धात पार पडले होते, जेव्हा P-8A पोसायडॉन सागरी गस्ती विमानाने जलमार्गावरून उड्डाण केले.

त्यावेळी अमेरिकन नौदलाच्या जहाजाने सामुद्रधुनीतून प्रवास केला होता याला दुजोरा दिला. ऑक्टोबरमध्ये कॅनडाच्या युद्धनौकेसह त्यांची ती संयुक्त मोहीम होती.

चीनचे सैन्य सामुद्रधुनीमध्ये दररोज प्रवास करते. बीजिंगच्या दबाव मोहिमेचा एक भाग म्हणून तैवानच्या सरकार या प्रकाराकडे बघते.

बुधवारी, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांना 30 चिनी लष्करी विमाने आणि सात नौदलाची जहाजे बेटाच्या आसपास कार्यरत असल्याचे आढळले आहे.

तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते यांनी बीजिंगच्या सार्वभौमत्वाचे दावे नाकारले असून फक्त तैवानचे लोक त्यांचे भविष्य ठरवू शकतात असे वारंवार स्पष्ट केले आहे.

अनुकृती
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleएरो इंडिया 2025: ‘CATS Warrior’ ड्रोनचे लक्षवेधी सादरीकरण
Next articleओलिसांची सुटका झाली नाही तर गाझा युद्धविराम संपुष्टात येईल – नेतान्याहू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here