हसीनांना पदच्युत करण्यात आपला हात नाही : अमेरिकेचे स्पष्टीकरण

0

अमेरिकेला सेंट मार्टिन बेट हवे होते या शेख हसीना यांच्या आरोपावरील अमेरिकेच्या प्रतिक्रियेसाठी खूप काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर सोमवारी अमेरिकेने या आरोपाचे खंडन केले. अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशातून पळून गेलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करण्यामागे अमेरिकेची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसने सोमवारी दिले. याबरोबरच अमेरिकेच्या हस्तक्षेपाचे आरोप खोटे असल्याचे म्हटले.

अमेरिकेच्या सहभागाविषयी विचारले असता व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कॅरीन जीन-पियरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यात आमचा अजिबात सहभाग नव्हता. या घटनांमध्ये अमेरिकेचे सरकार सामील असल्याचे कोणतेही वृत्त किंवा माहिती या निव्वळ अफवा आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

बंगालच्या उपसागरातील बांगलादेशच्या नियंत्रणखाली असणाऱ्या सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेला नियंत्रण हवे असल्याने हसीना यांना हटवण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप खुद्द हसीना यांनीच केल्याचे भारतातील इकॉनॉमिक टाइम्स (इटी) वृत्तपत्राने रविवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले होते. हसीना यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला होता, असे  इटीने म्हटले आहे.

हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद याने मात्र रविवारी हसीना यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही असे एक्सवरील एका पोस्टमध्ये सांगितले.

“आम्हाला विश्वास आहे की बांगलादेशी नागरिकांनी तिथल्या सरकारचे भवितव्य निश्चित केले पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही पाठिंबा देत आहोत,” असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

निवडणुका घेण्याच्या उद्देशाने नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील अंतरिम सरकारने गुरुवारी शपथ घेतली.

बांगलादेशातील काही गटांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या विरोधात झालेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचे रूपांतर गेल्या महिन्यात हसीना यांना पदच्युत करण्याच्या मोहिमेत झाल्यानंतर संपूर्ण बांगलादेश निदर्शने आणि हिंसाचाराने पेटला.

जानेवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता तर  अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष नसल्याचे म्हटले होते.

पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन तडकाफडकी बांगलादेश सोडल्यानंतर हसीना नवी दिल्ली येथे पोहोचल्या आणि  त्यांच्या 15 वर्षांच्या अखंडित राजवटीचा अंत झाला.  त्या लंडनमध्ये स्थायिक होणार आहेत अशाही अफवा ऐकायला मिळाल्या आहेत. मात्र, परिस्थिती अद्याप दोलायमान आहे. भारत सोडून इतर ठिकाणी आसरा घेण्याच्या दृष्टीने हसीना यांना बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. सेंट मार्टिन बेटाबद्दल अमेरिकेविरुद्धचे त्यांनी केलेले आरोप ब्रिटनला कदाचित पटणारे नाहीत.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स


Spread the love
Previous articleFilipino Officials Say Agreement with Beijing Over Disputed Shoal Subject To Review
Next articleIAEA Yet To Determine What Caused Fire At Zaporizhzhia Nuclear Plant, As both Sides Trade Charges

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here