व्हेनेझुएला: कैद्यांसाठी माफी कायदा आणि तुरुंगातील स्थिती सुधारण्याचा प्रस्ताव

0
माफी कायदा

व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षा डॅल्सी रॉड्रिग्ज यांनी, शुक्रवारी देशातील शेकडो कैद्यांसाठी प्रस्तावित ‘माफी कायद्याची’ घोषणा केली आणि सांगितले की, राजधानी काराकास येथील कुप्रसिद्ध ‘हेलिकॉइड’ या नजरकैद केंद्राचे रूपांतर आता क्रीडा आणि सामाजिक सेवा केंद्रात करण्यात येणार आहे.

“हा कायदा राजकीय संघर्ष, हिंसाचार आणि कट्टरवादामुळे झालेल्या जखमा भरून काढणारा आणि कायदा आपल्या देशात न्याय पुनर्संचयित करण्यासाठी तसेच व्हेनेझुएलाच्या नागरिकांमध्ये शांततापूर्ण सहअस्तित्व पुनःप्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरो,” असे रॉड्रिग्ज यांनी सर्वोच्च न्यायालयात आयोजित एका कार्यक्रमात सांगितले.

अन्यायकारक व्यवस्था

या प्रस्तावित कायद्याचा परिणाम, या देशातील तुरुंगात असलेल्या शेकडो कैद्यांवर, तसेच ज्या माजी कैद्यांची यापूर्वीच अटी शर्तींवर सुटका झाली आहे, त्यांच्यावर होऊ शकतो. हा नवीन कायदा 1999 पासून आजपर्यंतच्या प्रकरणांना लागू होईल, परंतु ज्यांनी हत्या, मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभाग घेतला असेल त्यांना यातून वगळले जाईल, असे रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले.

‘फोरो पेनल’ (Foro Penal) या मानवाधिकार संघटनेने एका निवेदनात या घोषणेचे “सकारात्मकतेने, पण सावधगिरीने” स्वागत केले आहे. हा कायदा न्याय, स्वातंत्र्य, शांतता आणि राष्ट्रीय सलोख्यासाठी योगदान देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या गटाने म्हटले आहे की, कायदा मंजूर होत असतानाच या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेली कैद्यांची सुटका सुरूच राहिली पाहिजे. त्यांच्या नोंदीनुसार अद्याप 711 राजकीय कैदी तुरुंगात आहेत.

राजकीय कैदी मानल्या जाणाऱ्यांच्या वरील आरोप आणि शिक्षा मागे घेण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीय आणि मानवाधिकार कार्यकर्ते दीर्घकाळापासून करत आहेत. विरोधी पक्षाचे नेते, सुरक्षा दलातील बंडखोर सदस्य, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर अनेकदा दहशतवाद आणि देशद्रोहासारखे आरोप लावले जातात, जे अन्यायकारक आणि मनमानी प्रकारातील असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

2019 पासून बंद असलेल्या, व्हेनेझुएलातील अमेरिकन दूतावासाच्या ‘X’ सोशल मीडिया अकाऊंटवर शुक्रवारी उशिरा माहिती देण्यात आली की, देशात ताब्यात घेतलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

कुप्रसिद्ध तुरुंग

रॉड्रीग्ज यांनी असेही सांगितले की, ‘हेलिकॉइड’ तुरुंग, जे दीर्घकाळापासून सरकारी दडपशाहीचे प्रतीक मानले जाते आणि मानवाधिकार गटांनी ज्याचा कैद्यांच्या छळाचे ठिकाण म्हणून निषेध केला आहे, ते आता क्रीडा आणि सामाजिक सेवा केंद्रात बदलले जाईल.

2022 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालात असा दावा करण्यात आला होता की, व्हेनेझुएलाच्या राज्य सुरक्षा संस्थांनी या कुप्रसिद्ध तुरुंगात; जे मूळत: एका मॉलचे प्रास्तावित डिझाईन होते, तिथे कैद्यांचा अमानुष छळ केला गेला. सरकारने मात्र संयुक्त राष्ट्रांचे हे निष्कर्ष फेटाळून लावले होते.

हेलिकॉइडमधील कैद्यांच्या नातेवाईकांनी गेल्या काही आठवड्यांत, तुरुंगाबाहेर रात्रभर मुक्काम ठोकून आपल्या नातेवाईकांच्या सुटकेची मागणी करत प्रार्थना सभा घेतल्या आहेत.

‘फोरो पेनल’नुसार, 8 जानेवारी रोजी सरकारने सुटकेची नवीन मालिका जाहीर केल्यापासून 303 राजकीय कैद्यांची सुटका झाल्याची त्यांनी पडताळणी केली आहे.

सरकारी अधिकारी, जे राजकीय कैदी असल्याचे नाकारतात आणि तुरुंगात असलेले लोक गुन्हेगार असल्याचे सांगतात; त्यांच्या म्हणण्यानुसार, 600 हून अधिक लोकांना सोडण्यात आले आहे. परंतु त्यांनी याच्या कालमर्यादेबद्दल स्पष्टता दिलेली नाही आणि यामध्ये मागील वर्षांतील सुटका झालेल्यांचाही समावेश असल्याचे दिसून येते. सरकारने किती कैद्यांची सुटका केली जाईल याची अधिकृत यादी किंवा ते कोण आहेत, याबद्दल कधीही माहिती दिली नाही.

सुटका आणि माफीच्या दीर्घकाळापासून समर्थकांमध्ये नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या आणि विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना माचाडो यांचा समावेश आहे, ज्यांचे अनेक जवळचे सहकारी तुरुंगात आहेत.

माचाडो म्हणाल्या की, “नवीन माफी कायदा अशी गोष्ट नाही जी प्रशासनाने स्वेच्छेने केली आहे, तर हे अमेरिकन सरकारकडून मिळालेल्या खऱ्या दबावाचे फळ आहे. तरी आम्हाला आशा आहे की, तुरुंगात असलेले सर्वजण लवकरच आपल्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र येतील.

अमेरिकेने 3 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून न्यूयॉर्क येथे न्यायालयात अमली पदार्थांशी संबंधित दहशतवादाच्या आरोपांखाली हजर केल्यानंतर या अलीकडील सुटक्यांची घोषणा करण्यात आली. मात्र, मादुरो यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleबांगलादेश निवडणुकीवर परकीय प्रभाव… त्यात भारतही आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here