ट्रम्प यांचे स्वप्न भंगले, मारिया मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

0

“व्हेनेझुएलातील लोकांच्या लोकशाही हक्कांसाठी, तसंच न्यायिक आणि शांततामय मार्गानं हुकुमशाहीविरोधात लोकशाहीसाठी संघर्ष करण्यासाठी” व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शुक्रवारी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला असल्याचे नॉर्वेजियन नोबेल समितीने म्हटले आहे.

विजनवासात असणाऱ्या 58 वर्षीय औद्योगिक अभियंता मचाडो यांना 2024 मध्ये व्हेनेझुएलाच्या न्यायालयांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यापासून रोखले होते. कारण त्यांनी 2013 पासून सत्तेत असलेले अध्यक्ष निकोलस मादुरो यांना आव्हान दिले होते.

“जेव्हा हुकूमशहा सत्ता काबीज करतात, तेव्हा उठणाऱ्या आणि प्रतिकार करणाऱ्या स्वातंत्र्याच्या धाडसी रक्षकांना ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते,” असे मचाडो यांनी म्हटले आहे.

“हे एकेकाळी खोलवर विभाजित असलेल्या राजकीय विरोधी पक्षातील एक प्रमुख, एकत्रित आणणारे व्यक्तिमत्त्व आहे – एक असा विरोधी पक्ष ज्याला मुक्त निवडणुका आणि प्रतिनिधी सरकारच्या मागणीत समान आधार मिळाला,” असे नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन वॅट्ने फ्रायडनेस म्हणाले.

ट्रम्प यांचे स्वप्न भंगले

या वर्षीच्या पुरस्कारा‌ची घोषणा होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार जाहीरपणे सांगितले की तेच यंदा नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्यास पात्र आहेत.

गाझा युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांच्या पुढाकाराच्या पहिल्या टप्प्यातील युद्धबंदी आणि ओलिसांबाबतच्या कराराची घोषणा बुधवारी होण्यापूर्वी समितीने अंतिम निर्णय घेतला.

नोबेल जाहीर होण्यापूर्वी, पुरस्कार निर्णय समितीवरील तज्ज्ञांनी असेही म्हटले होते की ट्रम्प जिंकण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण त्यांची धोरणे नोबेल समितीला प्रिय असलेली आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्था उद्ध्वस्त करणारी असल्याचे दिसून येत आहे.

मात्र अमेरिकेच्या राष्ट्रपतींना नोबेल पुरस्काराची आस असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. आतापर्यंत तीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ते पदावर कार्यरत असताना नोबेल पुरस्कार मिळाला आहे: 1906 मध्ये थिओडोर रुझवेल्ट, 1919 मध्ये वुड्रो विल्सन आणि 2009 मध्ये बराक ओबामा. तर या  पदावरून निवृत्त होऊन  दोन दशके पूर्ण झाल्यानंतर जिमी कार्टर यांनी 2002 मध्ये हा पुरस्कार जिंकला. माजी उपराष्ट्रपती अल गोर यांना 2007 मध्ये हा पुरस्कार मिळाला.

नोबेल शांतता पुरस्काराची रक्कम 11 दशलक्ष स्वीडिश क्राउन किंवा सुमारे 1.2 दशलक्ष डॉलर्स आहे. 10 डिसेंबर रोजी  स्वीडिश उद्योगपती अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिनी ओस्लो येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नोबेल यांनी  1895 मध्ये त्यांच्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची घोषणा केली होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleनवी दिल्लीत UNTCC प्रमुखांच्या परिषदेत 30 हून अधिक देश सहभागी होणार
Next articleट्रम्प यांचे भारतातील राजदूत सर्जियो गोर नव्या जबाबदारीबाबत उत्साही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here