व्हिएतनामच्या इतिहासात पहिल्यांदाच तिथल्या कम्युनिस्ट सरकारने अमेरिकेकडून पाच टी6-सी टेक्सन प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी विमाने विकत घेतली असून आणखी सात विमानांची मागणी नोंदवली आहे.
युरेशिया टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या अधिग्रहणामुळे अमेरिकेकडून एफ-16 विमाने खरेदी करण्याचा व्हिएतनामचा विचार अधिक स्पष्ट झाला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध होत आहेत. एफ-16 सारख्या प्रगत विमानांच्या वैमानिकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकन हवाई दल सामान्यतः टेक्सन या प्रशिक्षण विमानांचाच वापर करते.
व्हिएतनामने आतापर्यंत केवळ रशियाकडूनच लष्करी साधनसामुग्रीची खरेदी केली आहे. व्हिएतनामचे हवाई दल 35 एसयू-30 लढाऊ विमाने आणि जुनी एसयू-22 तैनात करण्यासाठी ओळखले जाते. एक अब्ज डॉलर्स इतकी अधिक प्रगत एसयू35 एस बहुउद्देशीय विमाने खरेदी करण्यासाठी व्हिएतनामची रशियाबरोबर बोलणी सुरू असल्याच्या बातम्या होत्या. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
युरेशिया टाईम्सच्या वृत्तानुसार व्हिएतनाम कदाचित “अधिक प्रगत, पाश्चिमात्य देशांमध्ये निर्माण झालेल्या लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत संभाव्य बदलाचे संकेत देत आहे कारण व्हिएतनाम आपली संरक्षण क्षमता वाढवण्याचा आणि सोव्हिएत काळातील उपकरणांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.”
2016 मध्ये अमेरिकेने व्हिएतनामला दिल्या जाणाऱ्या घातक शस्त्रांच्या विक्रीवरील बंदी उठवली. डिसेंबर 2022 मध्ये व्हिएतनाममधील संरक्षणविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात अमेरिकेचे माजी राजदूत मार्क नॅपर यांनी सूचित केले की ते व्हिएतनामच्या सैन्याचे आधुनिकीकरण आणि अधिक प्रगत तंत्रज्ञानानाने परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा देत आहेत.
युक्रेन युद्धामुळे रशियावर घालण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे रशियन शस्त्रे खरेदी करणे धोकादायक ठरू शकते.
परिणामी, युरेशिया टाईम्सच्या मते, “रशियाचा या क्षेत्रात असणारा दबदबा आता हळूहळू कमी होत चालला आहे.त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी चीन अधिकाधिक पावले उचलत आहे. प्रत्युत्तरादाखल लष्करी तंत्रज्ञानाची श्रेणी देऊ करणे आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापक संरक्षण संबंध वाढवणे या मार्गांनी अमेरिकेने या भागात आपला दबदबा वाढवत नेला आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये, इंडोनेशियाने रशियन एसयू-35 मध्ये गुंतवणूक करण्याची योजना सोडून बोइंगकडून 24 US F-15 ईगल लढाऊ विमाने खरेदी करण्याची योजना जाहीर केली. उंच समुद्रात चीनशी अधिक संघर्ष करण्यासाठी जकार्ताची तयारी सुरू असल्याने आणखी अमेरिकेकडून आणखी साधनसामुग्री घेण्याचा इंडोनेशिया विचार करू शकते.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)