जागतिक आव्हाने असूनही मजबूत आर्थिक वाढ हेच व्हिएतनामचे लक्ष्य

0
आर्थिक

व्हिएतनामचे सर्वोच्च नेते, तो लाम यांनी मंगळवारी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात प्रतिनिधींना संबोधित करताना, जागतिक अडथळ्यांना न जुमानता, या दशकाच्या उर्वरित काळात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक आर्थिक वाढ कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

हनोईमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या आणि आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुखाची निवड केली जाईल, जे देशातील सर्वात शक्तिशाली पद आहे. याशिवाय 2030 पर्यंतची आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित केली जातील.

लाम यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला प्रतिनिधींना सांगितले की, हे अधिवेशन “नैसर्गिक आपत्ती, वादळे आणि पूर ते साथीचे रोग, सुरक्षा धोके, तीव्र सामरिक स्पर्धा आणि ऊर्जा तसेच अन्न पुरवठा साखळीतील मोठ्या व्यत्ययांपर्यंत, अनेक परस्परव्यापी अडचणी आणि आव्हानांच्या” पार्श्वभूमीवर होत आहे.

देशाच्या सुरक्षा विभागाचे माजी प्रमुख, जे पक्षाचे प्रमुख म्हणून आपले पद कायम ठेवण्याचा आणि शक्यतो राज्याचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुखपदाच्या संक्षिप्त कार्यकाळात नोकरशाहीमध्ये दशकांमधील सर्वात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्यानंतर, सार्वजनिक प्रशासनात आणखी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

अधिवेशनासमोर सादर केलेल्या आणि रॉयटर्सने पाहिलेल्या एका पक्षीय दस्तऐवजानुसार, या दशकाच्या पहिल्या सहामाहीसाठी 6.5 टक्के ते 7.0 टक्के लक्ष्य गाठण्यात अपयश आल्यानंतर, 2030 पर्यंत वार्षिक वाढीचे लक्ष्य किमान 10 टक्के निश्चित करण्यात आले आहे.

लॅम यांना हव्या आहेत लालफितीची कमी लुडबूड आणि अधिक पायाभूत सुविधा

68 वर्षीय लॅम म्हणाले की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी व्हिएतनामनेही लालफितीची लुडबूड कमी करण्याचा आणि जागतिक व्यापार विस्तारण्याचा निर्धार केला आहे.

ट्रम्प प्रशासनाने ऑगस्टमध्ये व्हिएतनामवर लादलेल्या 20 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेला होणारी व्हिएतनामी निर्यात वाढण्यापासून थांबलेली नाही, परिणामी वॉशिंग्टनसोबत विक्रमी व्यापार अधिशेष निर्माण झाला आहे.

अर्थात, देश इतर भागीदारांसोबत व्यापारी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण अमेरिकन टॅरिफचा परिणाम येत्या काही महिन्यांत जाणवण्याची शक्यता आहे.

लॅम यांनी भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले, तथापि त्यांच्या कार्यकाळात दिवंगत गुयेन फू ट्रोंग यांनी सुरू केलेली लाचखोरीविरोधी मोहीम मंदावली आहे, कारण लॅम यांनी विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या मंजुरीची प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न केला.

“हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आणि मजबूत प्रादेशिक, आंतर-प्रादेशिक आणि जागतिक कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे,” असेही लॅम म्हणाले.

त्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे, ज्यामुळे आर्थिक वाढीला पाठिंबा मिळाला आहे, परंतु यामुळे दुसरीकडे घराणेशाही आणि उधळपट्टीबद्दलची चिंता वाढली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleINS Sudarshini Sets Sail on ‘Lokayan 26’, a Ten-Month Global Training Voyage
Next articleINS सुदर्शिनी ‘लोकायन 26’ या जागतिक प्रशिक्षण मोहिमेसाठी रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here