व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळाचे थैमान; 36 नागरिक दगावले

0

व्हिएतनाममध्ये आलेल्या बुआलोई वादळामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, वादळानंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे, 36 जण दगावल्याची माहिती, आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरुवारी दिली.

सोमवारी, उत्तर-मध्य व्हिएतनामध्ये बुआलोई वादळाची धडक बसली, ज्यामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या, वाऱ्याचा वेग तीव्र झाला आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. या आपत्तीजन्य परिस्थितीत 21 जण बेपत्ता झाले असून, 147 जण जखमी झाल्याचे अधिकृत वृत्त अहवालाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

अंदाजे $435.80 दशलक्ष मूल्याच्या मालमत्तेचे नुकसान

वादळ आणि पूरामुळे झालेल्या एकंदर नुकसानीचे मूल्य, 11.5 ट्रिलियन डोंग ($435.80 दशलक्ष) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात, $303 दशलक्षची नोंद झाली होती. 

अहवालानुसार, पूर आणि वादळामुळे रस्ते, शाळा, कार्यालये यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो कुटुंबं अंधारात आहेत.

अंदाजे 2 लाख 10 हजार घरे वादळामुळे नुकसानग्रस्त झाली असून, 51 हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेती आणि अन्य पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. 

हनोईमध्ये रस्ते जलमय

व्हिएतानामची राजधानी हनोईमध्ये, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागांतील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली.

49 वर्षीय रहिवासी होआंग कुआक उय यांनी सांगितले की, “सततच्या पावसामुळे महापुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पाणी थेट माझ्या घरच्या हॉलमध्ये शिरले. याआधी मी कधीच असे पाहिले नव्हते.”

उत्तर-मध्य व्हिएतनामातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे, तर काही घरांच्या छतांपर्यंत पाणी गेले आहे. तेथील वाहतुकीचे मार्ग आणि वीजपुरवठा दोन्ही बाधित झाले आहे.

राज्य प्रसारक VTV ने दाखवलेल्या दृश्यांमध्ये, न्गे अ‍ॅन प्रांतातील काही गावांमध्ये पूरामुळे अनेक घरे पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.

रहिवासी एनगो थि लोन (56) यांनी सांगितले की, “वादळामुळे माझ्या घराचे उडून गेले आहे आणि घर अर्धा मीटर पाण्यात बुडाले आहे. माझ्या सगळ्या सामानाचे खूप नुकसान झाले आहे.”

व्हिएतनामचे समुद्री क्षेत्र लांबवर पसरलेले असून, ते थेट दक्षिण चीन समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे दरवर्षी या भागात वादळे निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. ही वादळे सहसा जोरदार पावसासह येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)

+ posts
Previous articleट्विटर भागभांडवलाचा एसईसी खटला टेक्सासमध्ये हलवण्यात मस्क अपयशी
Next articleफ्रान्समध्ये जनाक्रोश; खर्च कपातीविरोधात कामगारांनी पुकारले आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here