नैऋत्य पाकिस्तानमधील ‘ऑनर किलिंग’मुळे देशभरात संतापाची लाट

0

नैऋत्य पाकिस्तानच्या एका दुर्गम भागात एका महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा “ऑनर किलिंग” दाखवणारा एक शेअर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या व्हिडिओमुळे आदिवासी रीतिरिवाजांकडे लक्ष वेधले गेले असून अशा गुन्ह्यांना अनेकदा कोणतीही शिक्षा होत नाही अशा देशात न्यायाच्या मागणीला जोर चढत आहे.

पाकिस्तानमध्ये दरवर्षी शेकडो तथाकथित ऑनर किलिंगच्या घटना घडतात, ज्यांना अनेकदा सार्वजनिक किंवा कायदेशीरदृष्ट्या कोणताही न्याय मिळत नाही, परंतु व्यभिचाराचा आरोप असलेल्या एका महिलेला आणि पुरूषाला पकडून काही पुरुष मारण्यासाठी वाळवंटात घेऊन जातानाचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये बानो बीबी नावाच्या महिलेला तिचा भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका पुरूषाने कुराण दिले आहे. “माझ्यासोबत सात पावले चालत या, त्यानंतर तुम्ही मला गोळी मारू शकता,” ती म्हणते आणि ती काही पावले पुढे जाऊन पुरुषांकडे तिची पाठ करून उभी रहाते.

भाऊ, जलाल सातकझाई, तिच्या दिशेने तीनदा गोळी झाडतो आणि ती कोसळते. काही सेकंदांनंतर तो एहसान उल्लाह समलानी या पुरूषाच्या दिशेने गोळी झाडून त्याचाही जीव घेतो.  याच्याशी बानोचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.

देशभरातून निषेध

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हत्याकांडाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यावर तातडीने सरकारी कारवाई करण्यात आली असून राजकारणी, विविध हक्कांसाठी लढणारे गट आणि धर्मगुरू यांच्याकडून निषेध करण्यात आला.

नागरी हक्क वकील जिब्रान नासिर म्हणाले की, सरकारचा प्रतिसाद न्यायापेक्षा कामगिरीबद्दल अधिक होता.

“हा गुन्हा काही महिन्यांपूर्वी घडला होता, गुप्तपणे नाही तर प्रांतीय राजधानीजवळ, तरीही २४ कोटी लोकांनी कॅमेऱ्यात बघत हत्येचे साक्षीदार होईपर्यंत कोणीही कारवाई केली नाही,” असे ते म्हणाले.

“हा गुन्ह्याचा प्रतिसाद नाही. हा व्हायरल झालेल्या क्षणाचा प्रतिसाद आहे.”

बलुचिस्तानच्या नसिराबाद जिल्ह्यात पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे, ज्यात एक आदिवासी प्रमुख आणि हत्या झालेल्या महिलेच्या आईचाही समावेश आहे.

आई गुल जान बीबी म्हणाली की, आदिवासी प्रमुखाच्या आदेशानुसार नव्हे तर “शतकांच्या जुन्या बलुच परंपरा” वर आधारित कुटुंबाने आणि तिथल्या स्थानिकांपैकी वडीलधाऱ्या व्यक्तींनी हे हत्याकांड घडवले.

“आम्ही कोणतेही पाप केलेले नाही,” असे तिने एका व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. “बानो आणि एहसानला आमच्या रितीरिवाजांनुसार मारण्यात आले.”

आईने सांगितले की तिची मुलगी, जिला तीन मुले आणि दोन मुली होत्या, ती एहसानसोबत पळून गेली होती आणि 25 दिवसांनी परत आली होती.

पोलिसांनी सांगितले की बानोचा धाकटा भाऊ, ज्याने या जोडप्याला गोळी मारली, तो अजूनही फरार आहे.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती म्हणाले की हे एक ‘चाचणी’ प्रकरण आहे आणि आपण कायद्याच्या बाहेर काम करणारी बेकायदेशीर आदिवासी न्यायालये उद्ध्वस्त करण्याचे वचन दिल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी यापूर्वी म्हटले होते की जिरगा, एक अनौपचारिक आदिवासी परिषद जी न्यायबाह्य निर्णय देते, त्यांनी या हत्यांचे आदेश दिले होते.

#JusticeForCouple

या व्हिडिओचा ऑनलाइन निषेध करण्यात आला असून #JusticeForCouple आणि #HonourKilling सारखे हॅशटॅग ट्रेंड झाले. धार्मिक विद्वानांची संस्था असलेल्या पाकिस्तान उलेमा कौन्सिलने या हत्यांना “इस्लाम धर्माला मान्य नसलेले” असे म्हटले आणि त्यात सहभागी असलेल्यांवर दहशतवादाचे आरोप लावण्याची मागणी केली.

शनिवारी प्रांतीय राजधानी क्वेटा येथे डझनभर नागरी समाज सदस्य आणि अधिकार कार्यकर्त्यांनी निदर्शने करत न्यायाची मागणी केली. याशिवाय समांतर न्याय व्यवस्था बंद करण्याची मागणी केली.

“वैभव ही दुधारी तलवार आहे,” असे सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ आणि लिंग तसेच पुरुषत्वाचा अभ्यास करणारे प्राध्यापक अरसलान खान म्हणाले.

ते सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव आणू शकते, परंतु सार्वजनिक निदर्शने ही समाजाच्या दृष्टीने घैरत (ऑनर)  किंवा कुटुंबाचा सन्मान पुन्हा प्राप्त करण्यासाठी एक रणनीती म्हणून देखील काम करू शकते.”

सोशल मीडिया स्टार कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तानने 2016 मध्ये ऑनर किलिंग्ज बेकायदेशीर ठरवण्यात आले, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी माफी दिल्यास गुन्हेगारांना मुक्त होण्याची परवानगी देणारी पळवाट बंद झाली. अधिकार गटांचे म्हणणे आहे की याची अंमलबजावणी करणे अतिशय जिकीरीचे काम आहे, विशेषतः ज्या ग्रामीण भागात आदिवासी पंचायतींचे अजूनही वर्चस्व आहे.

2024 मध्ये किमान 405 ऑनर किलिंग्ज

“ज्या देशात शिक्षा होण्याचे प्रमाण अनेकदा अत्यल्प आहे, तिथे साक्षीदार नसणे आणि त्यामुळे होणारा गोंधळ यांचा फायदा घेतला जातो,” असे घटनात्मक वकील असद रहीम खान म्हणाले.

“हे एका आत्मसंतुष्ट राज्याला धक्का देते जे त्याच्या अधिकाराबाहेरील क्षेत्रात जिरग्यांना (जात पंचायत) सहन करत आहे.”

पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने 2024 मध्ये किमान 405 ऑनर किलिंग्जची प्रकरणे नोंदवली आहेत. यात बळी पडलेल्या महिला आहेत, ज्यांना बहुतेकदा कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा दावा करणाऱ्या नातेवाईकांनी मारले आहे.

खान म्हणाले की, कायदा लागू करण्याऐवजी, सरकारने गेल्या वर्षभर न्यायपालिका कमकुवत करण्यात आणि माजी आदिवासी भागात जिरग्यांना पुनरुज्जीवित करण्याचा विचार करण्यात घालवला आहे.

“बलुचिस्तानमधील महिलांबद्दल ही कार्यकारी निष्क्रियता आहे हीच सर्वात लज्जास्पद गोष्ट आहे,” असेही खान म्हणाले.

अलिकडच्या काही महिन्यांत पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी वरिष्ठ मंत्र्यांना पाकिस्तानच्या माजी आदिवासी जिल्ह्यांमध्ये जिरगांना पुनरुज्जीवित करण्याच्या प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये आदिवासींमधील ज्येष्ठ व्यक्ती आणि अफगाण अधिकारी यांच्यात समन्वय साधणे समाविष्ट आहे.

पंतप्रधान कार्यालय आणि पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनीही टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

आधी व्हायरल आणि मग विस्मरण?

बलुचिस्तानमधील हत्याकांड पाकिस्तानच्या सिनेटमध्ये उपस्थित करण्यात आले, जिथे मानवाधिकार समितीने या हत्यांचा निषेध केला आणि जिरगा बोलावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. समांतर न्यायव्यवस्थेला शिक्षा न मिळाल्यानेच अशा प्रकारच्या हिंसाचाराला प्रोत्साहन मिळण्याचा धोका असल्याचे कायदेतज्ज्ञांनी देखील बजावले.

तथापि, कार्यकर्ते आणि विश्लेषक म्हणतात की हा संताप कायम राहण्याची शक्यता कमी आहे.

“आता आवाज आहे, परंतु प्रत्येक वेळीप्रमाणे, तो कमी कमी होत जाईल,” क्वेटा येथील मानवाधिकार वकील जलीला हैदर म्हणाल्या.

“अनेक भागात कायद्याची भीती नाही, अंमलबजावणी नाही. फक्त शांतता आहे.”

हैदर म्हणाले की, बलुचिस्तानसारख्या अल्पशासित प्रदेशात, जिथे आदिवासी शक्ती संरचना तिथे नसलेली न्यायालये आणि पोलिस यांच्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढतात. तिथल्या नागरिकांचे संरक्षण करण्यात राज्याला अपयश येत आहे हेच या हत्याकांडांवरून अधोरेखित होते.

“फक्त जिरगांचा निषेध करणे पुरेसे नाही,” हैदर म्हणाले.

“खरा प्रश्न असा आहे की: राज्य त्यांना सुरुवातीलाच परवानगी कशी काय  देते?”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleZen Technologies Projects Rs 6,000 Cr Revenue Over Three Years Despite Q1 Slowdown
Next articleराष्ट्रपती पुतिन नौदलाच्या कार्यक्रमात असताना, युक्रेनचा सेंट पीटर्सबर्गवर हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here