रशियाने युक्रेनच्या वीज सुविधांना केले लक्ष्य, झेलेन्स्की यांनी दिला सूडाचा इशारा

0

रशियाने, उत्तर आणि दक्षिण युक्रेनमधील वीज यंत्रणेवर रात्रीच्या वेळीस केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे, जवळपास 60,000 लोकांची वीज खंडित झाल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेन्स्की, यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशियन भूभागात आणखी खोलवर हल्ले करण्यास परवानगी देण्याची घोषणा केली. त्यांनी रशियाच्या या हल्ल्यांना, मॉस्कोच्या वीज प्रणालीला पंगू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असे संबोधले.

रशिया–युक्रेन युद्धाला साडेतीन वर्षे पूर्ण होत असताना, दोन्ही देशांनी अलीकडच्या आठवड्यांत हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशिया युक्रेनच्या ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थांवर लक्ष केंद्रीत करत असताना, युक्रेनने रशियन तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाईपलाइनवरील हल्ले सुरू ठेवले आहेत.

“आपल्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व सक्रिय कारवाई आम्ही सुरू ठेवू. शक्ती आणि संसाधने सज्ज आहेत. नव्या खोलवर हल्ल्यांचे नियोजनही पूर्ण झाले आहे,” असे झेलेन्स्की यांनी युक्रेनचे लष्करी प्रमुख ओलेक्सांद्र सर्स्की यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले.

ओडेसा प्रदेशातील ऊर्जा केंद्रांवर हल्ले

युक्रेनमधील सर्वात मोठ्या खाजगी ऊर्जा कंपनी DTEK ने सांगितले की, “रशियन ड्रोनने ओडेसा भागातील 4 ऊर्जा केंद्रांवर रात्रीच्या वेळी हल्ला केला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 29,000 लोक वीजेअभावी अंधारात होते.”

ओडेसा प्रांताचे गव्हर्नर ऑलेह कीपर यांनी सांगितले की, “सर्वाधिक फटका बसलेले शहर चोर्नोमॉर्स्क होते, जे ओडेसा जवळ आहे. तेथे घरे आणि प्रशासकीय इमारतींनाही नुकसान झाले.”

“महत्त्वाची पायाभूत सुविधा सध्या जनरेटरवर चालू आहे,” असे त्यांनी Telegram वर लिहीले. या हल्ल्यात 1 व्यक्ती जखमी झाली.

ओडेसा बंदराजवळच्या जलक्षेत्रात, बेलिझ ध्वज असलेले एक व्यापारी मालवाहू जहाज अज्ञात स्फोटक उपकरणावर आदळल्याने त्याला किरकोळ नुकसान झाले, अशी माहिती 2 स्त्रोतांनी दिली.

चेर्निहिवमध्येही वीज सुविधेवर हल्ला

रविवारी सकाळी, रशियन ड्रोनने युक्रेनच्या उत्तर चेर्निहिव भागावरही हल्ला केला. त्यामुळे ऊर्जाव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि 30,000 घरांची वीज गेली, ज्यामध्ये निझ्हिन शहराचाही काही भाग होता, असे गव्हर्नर व्याचेस्लाव चाउस यांनी सांगितले.

युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, “रशियाने एकूण 142 ड्रोन वापरून देशावर हल्ला केला, आणि युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने त्यातील बहुतांश ड्रोन पाडले. तरी 10 ठिकाणी ड्रोनचे हल्ले यशस्वी ठरले.”

तर, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “त्यांनी युक्रेनच्या अशा बंदरांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला जिथे लष्करी कामकाज चालते, असे त्यांचे म्हणणे आहे.”

युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हस्तक्षेप

अलीकडे दोन्ही बाजूंच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध समाप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे युद्ध फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाच्या पूर्ण आक्रमणानंतर सुरू झाले होते.

रविवारी, युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, “रशियाने यंदाच्या उन्हाळ्यातील आक्रमण यशस्वी झाल्याचा दावा केला असला तरी त्यांनी कोणतेही प्रमुख युक्रेनियन शहर पूर्णपणे ताब्यात घेतलेले नाही.”

“जनरल गेरासिमोव्ह यांच्या दाव्यांनुसार रशियन फौजांनी मोठे शहर जिंकलेले नाही. त्यांनी ताब्यात घेतलेल्या भूभागांची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर फुगवून सांगितली आहे,” असे युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफने सोशल मीडियावर म्हटले.

पोप यांची युद्धविरामासाठी विनंती

रविवारी क्रेमलिनने सांगितले की, “युरोपीय शक्ती ट्रम्प यांच्या शांततेसाठीच्या प्रयत्नांना अडथळा आणत आहेत, आणि रशिया आपल्या मोहिमेचा शेवट तेव्हाच करेल जेव्हा त्यांना खरेच वाटेल की युक्रेन शांततेसाठी तयार आहे.”

गेल्या आठवड्यात, रशियाने 2 वेळा मोठ्या प्रमाणावर हल्ले करून अनेक नागरिकांचा जीव घेतला आणि त्यांची घरे आणि नागरी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या.

“युद्ध हवे असलेली एकमेव शक्ती म्हणजे रशिया. त्यामुळे आपण दबाव वाढवत राहू, रशियावर दबाव कायम हवा आहे,” असे झेलेन्स्की यांनी रविवारी संध्याकाळच्या निवेदनात म्हटले.

“आपल्याला अमेरिका, युरोप आणि G20 देशांकडून ठाम भूमिका अपेक्षित आहे. हे युद्ध संपूर्ण जगभरातील प्रक्रिया अस्थिर करते. रशियाने त्याची किंमत मोजलीच पाहिजे – आणि ते मोजेल,” असे ते म्हणाले.

अमेरिकेच्या युक्रेनसाठी विशेष दूतांनी म्हटले की, रशियन हल्ले ट्रम्प यांच्या युद्धबंदी प्रयत्नांना कमकुवत करत आहेत. दरम्यान, पोप लिओ यांनी रविवारी युद्धविराम आणि संवादासाठी आवाहन केले.

“हे जबाबदार लोक आता शस्त्रधारणेचे तर्क सोडून, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पाठिंब्याने वाटाघाटी आणि शांततेचा मार्ग स्वीकारावा, हाच योग्य वेळ आहे,” असे पोप लिओ यांनी रविवारी सेंट पीटर्स स्क्वेअर मध्ये जमलेल्या भाविकांशी प्रार्थनेदरम्यान सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndonesia: दंगलीनंतर आंदोलकांनी मोर्चे पुढे ढकलले, सुरक्षा व्यवस्थेत वाढ
Next articleSCO Denounces Pahalgam Attack, Urges Unified Response to Combat Terrorism

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here