ईशान्य भारतातील बंडखोरी आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमा अशा दोन्ही आघाड्यांवर आपले कर्तृत्त्व सिद्ध केलेले आणि विविध प्रसंगात लष्कराला मदत करणारे ‘आसाम रायफल्स’ हे निमलष्करीदल यंदा आपल्या स्थापनेची १८९ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने ‘भारतशक्ती’च्या टीमने आसाम रायफल्सच्या शिलॉंग येथील मुख्यालयाला भेट दिली व आसाम रायफल्सचा देदीप्यमान इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ईशान्येत महत्त्वाची भूमिका
आसाम रायफल्स, देशातील सर्वांत जुने निमलष्करी दल. ब्रिटिशांनी १८९ वर्षांपूर्वी आसाममधील चहाच्या मळ्यांचे रक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या या सशस्त्र तुकडीने गेल्या १८९ वर्षांत तिचा बालेकिल्ला असलेल्या ईशान्य भारतात तर अनेक मोहिमांत आपले कर्तृत्त्व सिद्ध केलेच, पण देशातील इतर भागात तैनात असतानाही आपली जबाबदारी चोख बजावली व ‘ध्वज विजया’चा उंचावण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. एक सशस्त्र तुकडी ते देशातील एक महत्त्वाचे निमलष्करी दल हा मोठा व मानाचा प्रवास ‘आसाम रायफल्स’ने पार पाडला. ईशान्य भारत हे प्रामुख्याने आसाम रायफल्सचे कार्यक्षेत्र आहे. या भागात एका अर्थाने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची भूमिका आसाम रायफल्स पार पाडत आहे. भारत-म्यानमार सीमेचे रक्षण ही या दलाची प्रमुख जबाबदारी असली, तरी या भागातील बंडखोरी व दहशवादविरोधी मोहिमांत लष्कराला मदत करण्याची भूमिकाही आसाम रायफल्स पार पाडत असते. ईशान्य भारतातील अत्यंत विषम हवामान, डोंगराळ भागामुळे या भागात काम करणे हे एक मोठे आव्हान असते. अशा ठिकाणी लष्करी मोहिमा राबविण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज भासते. त्या पार्श्वभूमीवर आसाम रायफल्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
इतिहासात डोकावताना..
‘कॅचर लेवी’ हे ब्रिटिशांनी १८३५मध्ये स्थापन केलेले एका अर्थाने एक असंघटीत सशस्त्र दल होते. ईशान्य भारतातील जनजाती टोळ्यांपासून चहा मळ्यांचे रक्षण ही या दलाची प्राथमिक भूमिका होती. ईशान्य भारतावर ब्रिटीशांची पकड मजबूत होत गेली, तसा त्यांनी या भागातील बंडखोरीविरोधात लढण्यासाठी या दलाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १८८३ मध्ये या दलाचे आसाम फ्रंटीअर पोलीस असे नामाभिधान झाले. त्यानंतर १८९१पासून याला आसाम मिलिटरी पोलीस म्हणण्यात येऊ लागले. हे नाव बदलून १९१३मध्ये हे दल पूर्व बंगाल व आसाम मिलिटरी पोलीस म्हणून ओळखले जाऊ लागले व १९१७मध्ये या दलाला सध्याचे, म्हणजे आसाम रायफल्स हे नाव मिळाले. स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारताला मोठ्याप्रमाणात बंडखोरीने ग्रासले व तेथील स्थैर्यावर याचा परिणाम होऊ लागला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हे दल तैनात करण्यात आले. त्याकाळात या आसाम रायफल्स परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करीत असे. भारत आणि चीनदरम्यान १९६२मध्ये झालेल्या युद्धानंतर या दलाची जबाबदारी कामकाजविषयक लष्कराकडे देण्यात आली. गृह मंत्रालयाकडे १९६५ पासून या दलाचे नियंत्रण सोपविण्यात आले. मात्र, कामकाजाची सूत्रे (ऑपरेशनल कंट्रोल) लष्कराकडेच राहिली. त्यामुळे दुहेरी नियंत्रण असलेले आसाम रायफल हे भारतातील एकमेव निमलष्करी दल आहे. आसाम रायफल्सच्या एकूण ४६ बटालियन असून, त्यापैकी २० बटालियन भारत-म्यानमार सीमेवर तैनात आहेत. तर, २६ दहशतवाद व बंडखोरी विरोधातील कारवाईसाठी तैनात आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये तैनात दोन बटालियनचाही समावेश आहे.
चीनला रोखले
आसाम रायफल्सच्या मुख्यालयात आम्ही या दलाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पी. सी. नायर यांची भेट घेतली. त्यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धात आसाम रायफलची भूमिका किती महत्त्वाची होती, याची माहिती आम्हाला दिली. ईशान्य भारतातील सियाचीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयनगरचे महत्त्व त्यांनी सांगितले. ‘जनरल गुराया यांच्या तुकडीने प्रत्यक्ष युद्धापूर्वी चिन्यांची चाल ओळखली होती व त्यांना रोखले होते. ही तुकडी तेथे नसती, तर चिनी या भागात घुसले असते आणि युद्धाचा परिणाम खूप वेगळा दिसला असता.’ हा ७३० चौरस किमीचा भाग भारतासाठी का महत्त्वाचा आहे, हे सांगताना जनरल नायर म्हणाले, ‘या भागातून बह्म्पुत्रेच्या दक्षिण किनाऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणजे या भागात एकदा का तुम्हाला प्रवेश मिळाला, की तुम्ही ब्रह्मपुत्रा नदी न ओलांडता दिब्रुगढ, जोरहाट व पुढे थेट गुवाहाटीपर्यंत मजल मारू शकता. मात्र, जनरल गुराया यांच्या तुकडीने त्यांना अडविल्यामुळे चिनी या भागातून पुढे येऊ शकले नाहीत व त्यांना तेजपूर, तवांग या भागाकडे जावे लागले. त्यामुळे चीनला नको असलेल्या भागात त्यांना यावे लागले व त्यांची गती मंदावली. हे यश आसाम रायफल्सचे आहे.’
महत्त्व कायमच
विशेष म्हणजे आसाम रायफल्सच्या जवानांचे निवृत्तीचे वय साठ वर्षे आहे. त्यांना एका विशिष्ट बटालियनमध्ये नेमले जाते व बहुतांश काळ ते त्याच ठिकाणी सेवा करतात. कधीकधी त्यांना तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर जावे लागते. आता आसाम रायफल्स पूर्वीसारखे पुरुषकेन्द्री दल राहिले नाही. महिलाही मोठ्या संख्येने या दलात भारती होत आहेत व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ईशान्येतील बंडखोरीविरोधात लढत आहेत. आसाम रायफल्सचे कार्यक्षेत्र संपूर्ण ईशान्य भारत असल्याने जनरल नायर यांच्याशी मणिपूरमधील मैतेयी-कुकी संघर्षाबाबतही चर्चा झाली. या काळात आसाम रायफल्सवर पक्षपातीपणाचाही आरोप झाला. मात्र, जनरल नायर यांनी हे आरोप फेटाळून लावले. ‘आम्ही निःपक्षपातीपणे काम करीत आहोत. शांतता प्रस्थपित करणे हेच आमचे काम आहे आणि आम्हाला या भागात शांतता हवी आहे,’ असे जनरल नायर म्हणाले. मणिपूरमधील ही घटना सोडता, हिमाच्छादित पर्वत आणि हिरव्यागार दऱ्याखोऱ्यानी नटलेला ईशान्य भारत बहुतांश शांतच आहे. गेल्या काही दशकांपासून परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे आसाम रायफल्स आता संदर्भहीन झाली आहे, असे कोणाचे मत असेल, तर त्यांना दूरदृष्टी नाही किंवा ते मोठ्या परिप्रेक्ष्यातून या कडे पाहत नाहीत, असे म्हणावे लागेल, असेही जनरल नायर म्हणाले.
आसाम रायफल्सचा १९० वर्षांचा इतिहास, या काळात जगभरात केलेल्या विविध मोहिमा व दहशतवादविरोधी कारवाया आणि त्या मोहिमांच्या अनेक अविस्मरणीय कथा हा सगळा इतिहास आम्ही ‘भारतशक्ती’च्या वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या या सुमारे दोन शतकांच्या वाटचालीत अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार असलेल्या अथवा या घटनांत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘आसाम रायफल्स’ची वाटचाल दिवसेंदिवस अधिक दमदार होत आहे. ही वाटचाल येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी व प्रेरणादायी आहे आणि राहील, यात शंकाच नाही.
(अनुवाद: विनय चाटी)