दि. ०१ मे: पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक आणि आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल लष्करातील ३७ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर मंगळवारी निवृत्त झाले.
जम्मू येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर जनरल कोतवाल यांनी १९९२ मध्ये लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच, त्यांनी, ‘नॅशनल बोर्ड ऑफ मेडिसिन’ची पदविकाही घेतली आहे. ते राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकादमीचे सदस्य आहेत. त्यांनी २००० मध्ये चंदीगडयेथून ‘एंडोक्रिनोलॉजी’मध्ये डॉक्टरेट ऑफ मेडिसिन (डीएम) प्राप्त केली. जनरल कोतवाल नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी २०१६मध्ये संरक्षण व सामरिकशास्त्र विषयात एम.फिल पदवीही मिळविली आहे. जनरल कोतवाल यांनी नवी दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल आणि पुण्यातील कमांड हॉस्पिटल (सदर्न कमांड) येथे वरिष्ठ सल्लागार (मेडिसिन) आणि एंडोक्रिनोलॉजिस्टसह शैक्षणिक, क्लिनिकल आणि प्रशासकीय सेवा बजाविली आहे. कमांडंट, आर्म्ड फोर्सेस क्लिनिक, नवी दिल्ली, सहाय्यक चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) आणि मेजर जनरल (मेडिकल),मध्य भारत एरिया, जबलपूर येथेही त्यांनी काम केले आहे.
भारताच्या चार राष्ट्रपतींचे वैद्यकीय सल्लागार म्हणूनही त्यांनी सेवा बजाविली आहे. जनरल कोतवाल यांना उल्लेखनीय सेवेबद्दल ‘अति विशिष्ट सेवा पदक’, ‘विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘सेना पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक (डीजीएएफएमएस) लेफ्टनंट जनरल दलजित सिंग यांनी सेवानिवृत्त झाल्याबद्दल जनरल कोतवाल यांचे अभिनंदन केले.
विनय चाटी