चीनमधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना संरक्षणमंत्र्यांचे आवाहन
नवी दिल्ली : भांडवली आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकी कंपन्यांसाठी भारत हा अतिशय उत्तम पर्याय आहे. चीनमधील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे तेथून बाहेर पडत असलेल्या उद्योगांनी या लाभदायक पर्यायाचा विचार करावा, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले. स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना २०४७ पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत जाण्याचे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी या उद्योगांकडे असलेल्या तांत्रिक प्रगतीचा भारताला उपयोग होऊ शकतो, अशी अपेक्षाही राजनाथसिंग यांनी व्यक्त केली.
इंडो-अमेरिकन चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्यावतीने आयोजित ‘अमृतकाळ-आत्मनिर्भर भारत आणि भारत-अमेरिका संबंध,’ या विषयावरील परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘चीनला पर्याय शोधत असणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना भारत हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. भारतातील गुतंवणूक या कंपन्यांना चांगला परतावा देणारी ठरू शकते, त्यामुळे हे उभय देशांना फायदेशीर आहे.’ भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर भारतातील विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात केलेले भारतातील तरुण अमेरिकी उद्योगांची कुशल मनुष्यबळाची गरज भागवणारी आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सध्या अनेक आव्हाने उभी आहेत. त्याचा सामना करण्यासाठी आणि आपली स्वायत्तता जपण्यासाठीही या उद्योगांना भारत उपयुक्त ठरू शकतो, असे राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले. बदलत्या भूराजकीय आणि भूसामारिक परिस्थितीचा विचार करता भारत आणि अमेरिका या नैसर्गिक भागीदारांनी त्यांची ही भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली.
देशांन्तर्गत संरक्षण उत्पादक कंपन्यांना चालना देण्यासाठी व त्या उत्पादकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत व्हावी, या उद्देशाने संरक्षण उत्पादनांच्या खरेदीसाठी असलेल्या एकूण तरतुदीपैकी ७५ टक्के तरदूत देशी कंपन्यांसाठी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या या तरतुदीमुळे संरक्षण उत्पादने निर्यात करणाऱ्या पहिल्या २५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘भारताने थेट परकी गुंतवणूक कायदा आणि कामगार कायद्यात सुधारणा केली आहे. तसेच, रस्ते, रेल्वे, बंदरे, वीजनिर्मिती, अश्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. या सर्व सुविधा जागतिक दर्जाच्या करण्याकडे आमचा कटाक्ष आहे. त्यामुळे, पायभूत आणि इतर क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत उत्तम पर्याय आहे.’
राजनाथसिंग, संरक्षणमंत्री