गुप्तहेर यंत्रणेच्या प्रमुखाला ताब्यात द्या

0
युक्रेनच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख वास्यील मलीऊक (विकिमीडिया)

रशियाची मागणी: तथ्यहीन असल्याचा युक्रेनचा दावा

दि. ०१ एप्रिल: रशियात घडविण्यात आलेल्या दहशतवादी कारवायांत युक्रेनच्या गुप्तचर संघटनेचा हात असून, या संघटनेचे प्रमुख वास्यील मलीऊक यांना ताब्यात द्यावे, अशी मागणी रशियाने युक्रेनकडे केली आहे. मात्र, ‘तथ्यहीन’ या शब्दात युक्रेनने रशियाची मागणी फेटाळली असून, पुतीन यांच्यावरच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे समन्स असल्याची आठवण रशियाला करून दिली आहे.

रशियाने २०२२मध्ये युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर घडलेल्या दहशतवादी कारवायांची यादी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली आहे. या कारवायांना जबाबदार असलेल्या युक्रेनच्या नागरिकांना अटक करून त्यांना रशियाकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनकडे केली आहे. या यादीत युक्रेनच्या गुप्तचर संस्थेचे, ‘एसबीयू’चे प्रमुख वास्यील मलीऊक यांचे नाव अग्रक्रमावर आहे. युक्रेनकडे रशियाने आपली मागणी स्पष्ट केली आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना तातडीने अटक करून आमच्या ताब्यात देण्यात यावे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

रशियाने २०१४मध्ये युक्रेनच्या ताब्यातील क्रिमीयावर आक्रमण करून तो भाग आपल्याशी जोडून घेतला होता. त्यानंतर या भागाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी रशियाची मुख्यभूमी व क्रिमीयादरम्यान पूल बांधण्यात आला होता. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनच्या सैन्याने हा पूल उडवून दिला होता. या कारवाईमागे वास्यील मलीऊक यांचा हात असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, युक्रेनच्या सरकारने रशियाची ही मागणी फेटाळली आहे. ‘युक्रेनमधील बालकांना बेकायदा रशियात नेल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. हेगमधील हा लवाद अद्यापही पुतीन यांची वाट पाहत आहे, असे युक्रेनने म्हटले आहे.

रशियामध्ये गेल्या महिन्यात एका कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्यात १४४ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला इस्लामी दहशतवाद्यांनी केला असला, तरी त्यांना युक्रेनची फूस होती असा रशियाचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियाने ही मागणी केली आहे.


Spread the love
Previous articleहौती ड्रोन पाडल्याचा अमेरिकेचा दावा
Next articleतुर्कीच्या स्थानिक निवडणुकांमध्ये एर्दोगन यांच्या सत्तेसमोर तगडे आव्हान, महापौर निवडणुकीत विरोधकांचा मोठा विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here