इंजिनात बिघाड झाल्यामुळे भर समुद्रात फसली होती नौका
दि. १७ एप्रिल: इंजिनात बिघाड झाल्यामुळे भर समुद्रात फसलेल्या मच्छीमार बोटीची तटरक्षकदलाकडून मंगळवारी सुटका करण्यात आली. कर्नाटकच्या किनारपट्टीवरील कारवारपासून २१५ सागरी मैलांवर ही कारवाई करण्यात आली.
भारतीय तटरक्षकदलाच्या सावित्रीबाई फुले या गस्ती नौकेला कारवारपासून २१५ सागरी मैलांवर रोझरी हे मच्छीमार नौका इंजिनात बिघाड झाल्यामुळे भर समुद्रात फसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तटरक्षकदलाच्या नौकेने या फसलेल्या बोटीचा माग काढला व त्या बोटीला समुद्रात गाठले. बोटीच्या बोट पूर्णपणे बंद होऊ नये या साठी तटरक्षकदलाच्या अभियंत्यांनी बोटीच्या इंजिनाची समुद्रातच तातडीने तात्पुरती दुरुस्ती केली. या बोटीला नंतर तटरक्षकदलाच्या कर्नाटक जिल्हा मुख्यालयाच्या समन्वयाने कारवार बंदराकडे ओढून आणण्यात आले. त्यानंतर ही बोट लक्ष्मीनारायण नावाच्या मच्छीमार नौकेच्या ताब्यात देण्यात आली. या बोटीने इंजिनात बिघाड झालेल्या बोटीला सुखरूप बंदरात पोहोचविले, अशी माहिती तटरक्षकदलाकडून देण्यात आली आहे.
विनय चाटी