‘एम्स’ व केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचे सहकार्य
दि. ०१ मे: सामाजिक उत्तरदायित्त्व मोहिमेंतर्गत भारतीय तटरक्षकदलाच्यावतीने लक्षद्वीपमधील कवरत्ती आणि अँड्रोथ या दुर्गम बेटांवर २९ व ३० एप्रिल असे दोन दिवस वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) व केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या मदतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही बेटांवरील प्रत्येकी दीड हजार नागरिक या शिबिरामध्ये सहभागी झाले. त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह मोफत औषधे देण्यात आली.
शिबिरात सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या पथकाचे नेतृत्व ‘एम्स’चे (दिल्ली) संचालक डॉ.एम श्रीनिवास यांनी केले. या पथकामध्ये स्त्रीरोग, बालरोग, मज्जातंतूरोग, त्वचारोग, अस्थिरोग आणि इतर क्षेत्रांतील पंधरा तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. दुर्गम भागातील बेटांवर असलेल्या रुग्णांना विशेष वैद्यकीय तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या माध्यमातून स्थानिक जनतेची मदत करणे, यावर या आरोग्य शिबिरामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध आरोग्य सुविधाविषयक पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांना मुलभूत जीवन रक्षक प्रणाली (बीएलएस)ची माहिती देणारी व्याख्याने देखील दिली.
शिबिराचे उद्घाटन डॉ.एम श्रीनिवास यांच्या हस्ते झाले. तटरक्षक दलाच्या पश्चिम प्रदेशाचे कमांडर महानिरीक्षक भीष्म शर्मा, सीजीएचक्यूमधील वैद्यकीय सेवा विभागाच्या मुख्य संचालक, शल्यक्रिया विशारद कोमोडोर दिविया गौतम आणि लक्षद्वीपचे आरोग्य सचिव अवनीश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विनय चाटी