महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कारवाई: बारा लाखांची रोकडही जप्त
दि. १८ एप्रिल: भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) मुंबईच्या वायव्येला डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली भारतीय मासेमारी बोट अनधिकृत रोख रकमेसह ताब्यात घेतली. सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘आयसीजी’च्या पश्चिम विभाग मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी कारवाईला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील सुमारे दोनशे चौरस मैलाच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात सुरु सलेल्या मासेमारी, तसेच व्यापारी रहदारीचे आव्हान पेलून तटरक्षक दलाकडून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
तटरक्षक दलाच्या दोन वेगवान गस्ती बोटी आणि एक ‘इंटरसेप्टर’ बोट यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रथम संशयित बोटीचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानंतर १५ एप्रिलच्या रात्री बोटीवर प्रवेश करण्यात आला. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले, की डिझेल तस्करीच्या उद्देशाने संशयित भारतीय सागरी पुरवठा जहाजाच्या (ओएसव्ही) दिशेने जाण्यासाठी पाच खलाशी असलेली ही बोट मांडवा बंदरातून १४ एप्रिल रोजी निघाली होती. या बोटीवर २० हजार लिटर इंधन साठवण्यासाठी रचनेत बदल केले असल्याचे, तसेच ही बोट खोट्या व अनेक वेगवेगळ्या नावांनी चालवली जात असल्याचे आढळून आले. संशयित बोटीवर आढळून आलेल्या कागदपत्रांमध्ये असलेल्या माहितीचा अर्थ लावल्यावर या बोटीच्या नोंदणीमध्ये अनेक प्रकारच्या विसंगती आढळून आल्या. तसेच, तस्करी केलेल्या डिझेलच्या बदल्यात किनारपट्टीवर कार्यरत काही भारतीय ‘ओएसव्ही’ना देण्याच्या उद्देशाने ठेवलेली ११.४६ लाख रुपयांची रोख रक्कम देखील या बोटीवर सापडली.
ही बोट १७ एप्रिलच्या पहाटे मुंबई बंदरात आणण्यात आली असून, या संदर्भात आणखी धागेदोरे शोधण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क विभाग आणि राज्य पोलीस दल यांच्यातर्फे संयुक्त तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी