‘तेजस मार्क-१ए’ मार्चअखेर हवाईदलात

0
Tejas

दि. २१ मार्च: देशांतर्गत निर्मित तेजस या हलक्या लढाऊ विमानाची अत्याधुनिक आवृत्ती असलेले ‘तेजस मार्क-१ ए’ हे लढाऊ विमान मार्चअखेर हवाईदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. तेजसची ही नवी आवृत्ती अधिक चपळाईने व्यूहात्मक हलचालीसाठी सक्षम करण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड या विमान उत्पादन संस्थेने तेजसची निर्मिती केली आहे. हवाईदलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ‘तेजस मार्क-१ए’ या ८३ विमानांचा समावेश हवाईदलात करण्यात येणार आहे. त्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, हवाईदलाने ही मागणी ‘एचएएल’कडे नोंदविली होती. त्यापैकी पहिली तुकडी मार्चअखेर हवाईदलात दाखल होणार आहे. त्या व्यतिरिक्त तेजस या ९७ हलक्या लढाऊ विमानांची मागणीही हवाईदलाने नोंदविली आहे. त्यासाठी ६५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी एका काही दिवसांपूर्वीच या खरेदीला हिरवा कंदील दिला होता. या समावेशामुळे हवाईदलातील तेजस विमानांची संख्या दोनशे, सुमारे २० स्क्वाड्रन, होणार आहे.

‘तेजस मार्क-१ए’ची वैशिष्ट्ये

तेजस हे एक इंजिन असलेले, डेल्टा विंग (त्रिकोणी पंख) व वजनाला हलके असे बहुपयोगी लढाऊ विमान आहे. शत्रूच्या नजरेआड राहून शत्रूप्रदेशातील लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. नव्या आवृत्तीत अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक रडार यंत्रणा, विमानान यंत्रणा असल्यामुळे शत्रूची विमाने पकडण्याची याची क्षमता उच्च दर्जाची आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक लक्ष्यभेद यंत्रणा, अचूक लक्ष्यभेद करणारी युद्धसामग्री, दृष्टीच्या टप्प्याआड असलेले लक्ष्य टिपण्याची क्षमता, विमानाला नियंत्रित करणारी डिजिटल यंत्रणा, अत्याधुनिक संदेशवहन यंत्रणा या सर्व यंत्रणांमुळे हे विमान अतिशय परिणामकारक ठरले आहे. भारताची संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील देशांतर्गत संशोधन व विकास क्षमता या विमानामुळे सिद्ध झाली आहे. तेजस मार्क-१ए हे विमान हवाईदल सध्या वापरत असलेल्या मिग-२१ व मिग-२७ या रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांची जागा घेणार आहे.

विनय  चाटी  


Spread the love
Previous articleतटरक्षक दलाकडून आठ मच्छीमारांची सुटका
Next articleहवाईदलाच्या तंजावूर तळावर हेलिकॉप्टरची नवी तुकडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here