‘तेजस’साठीचे महत्त्वाचे सुटे भाग ‘एचएएल’कडे सुपूर्द

0
‘एलसीए’ तेजस ‘एमके-१ ए’
‘एलसीए’ तेजस ‘एमके-१ ए’

‘डीआरडीओ’कडून विकसित: अत्याधुनिक ऍक्च्युएटर्स आणि एअरब्रेक नियंत्रित मॉड्यूल

दि. २० एप्रिल: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ने (एडीए) स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक ॲक्ट्युएटर्स आणि एअरब्रेक नियंत्रित मॉड्यूलची पहिली खेप ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडे (एचएएल) सुपूर्द केली आहे. या यशामुळे देशाने विमान उड्डाण तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्णतेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. लखनऊ येथील ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने सध्याच्या ८३ ‘एलसीए’ तेजस ‘एमके-१ ए’ साठी या सामग्रीच्या उत्पादनाची  तयारी आधीच सुरु केली आहे.

‘तेजस’च्या दुय्यम फ्लाइट कंट्रोलमध्ये अत्याधुनिक स्लॅट्स आणि एअरब्रेक्सचा समावेश आहे. त्यात आता अत्याधुनिक सर्वो-व्हॉल्व्ह आधारित इलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो ॲक्ट्युएटर आणि कंट्रोल मॉड्यूल्सचा समावेश करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण रचना, अचूक उत्पादन, संरचना आणि चाचण्या ही वैशिष्ट्ये असलेले हे उच्च दाबाचे रिडंडंट सर्वो ॲक्ट्युएटर्स आणि नियंत्रण मॉड्यूल म्हणजे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या स्वदेशी तांत्रिक कौशल्य विकासासाठीच्या अथक प्रयत्नाची फलनिष्पत्ती आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ने हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत (RCI) आणि बेंगळूरू येथील केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्था (CMTI) यांच्या सहयोगाने या तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण बनण्याची  योजना आखली आहे. अत्याधुनिक ॲक्ट्युएटर्स आणि एअरब्रेक नियंत्रित मॉड्युल्ससाठी आवश्यक असलेल्या फ्लाइट ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केल्याने या सामग्रीच्या उत्पादन मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे  तेजसच्या एमके-१ए या श्रेणीला सुसज्ज करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सज्ज झाले  आहे.

तेजससाठीच्या या महत्त्वपूर्ण घटकांचे उत्पादन लखनऊ येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ॲक्सेसरीज विभागात सुरू असून, हे भारताच्या एरोस्पेस उत्पादन क्षमतांना बळ देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘सीईएमआयएलएसी’ व ‘डीजीएक्यूए’ सारख्या प्रमाणन संस्था, मुंबईतील गोदरेज एरोस्पेस या कंपनीसह सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांचे उल्लेखनीय योगदान या प्रयत्नात अत्यंत मोलाचे ठरले आहे.

हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल संरक्षण विभागाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक यांनी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, आरसीआय, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, सीएमटीआय आणि सर्व सहभागी उद्योगांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

 

विनय चाटी

स्रोत: पीआयबी


Spread the love
Previous articleभारत वैज्ञानिक महासत्ता होण्यासाठी सज्ज : नेचर मासिकाचा दावा
Next articleCDS Urges Military And DRDO To Collaborate With Startups For Space Tech Advancement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here