दि. ०५ एप्रिल: क्षेपणास्त्र व बहुविध शस्त्रास्त्रप्रणालींच्या चाचणीसाठी पश्चिम बंगालमध्ये नवा चाचणी तळ उभारण्याचा निर्णय संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) घेतला आहे. या तळाच्या उभारणीसाठी आवश्यक परवानगी केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात आली असून, चाचणी तळाच्या उभारणीचे कामही सुरु करण्यात आले आहे. या भागातील स्थानिक व पर्यावरणाला नुकसान होऊ नये याची काळजीही घेण्यात येणार आहे, असे ‘डीआरडीओ’कडून सांगण्यात आले.
ओडिशातील चंडीपूर येथे ‘डीआरडीओ’चा क्षेपणास्त्र एकात्मिक क्षेपणास्त्र चाचणी तळ आहे. मात्र, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीचे काम सुरू असल्यामुळे नव्याने चाचणी प्रक्रियेत असलेल्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. लष्कर, नौदल, हवाईदल, अंतराळ, सायबर अशा देशाच्या विविध संरक्षण विषयक गरजा भागविण्याच्या दृष्टीने विविध शस्त्रे व प्रणाली निर्मिती हे ‘डीआरडीओ’चे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे चंडीपूर येथे कामाचा व्याप वाढला आहे. क्षेपणास्त्र निर्मिती प्रक्रियेत त्याची चाचणी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे त्याला सर्वोच्च प्राथमिकता देणे गरजेचे आहे. म्हणूनच, चंडीपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात असलेल्या जुनपत या गावात ८.७३ एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. दिघा या रिसॉर्टसाठी प्रसिध्द असलेल्या पर्यटनस्थळापासून जुनपत ४० किलोमीटर अंतरावर असून कोलकातापासून त्याचे अंतर १७० किलोमीटर इतके आहे.
जुनपत हे गाव पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात आहे. एकात्मिक क्षेपणास्त्र चाचणी तळासाठी आवश्यक सर्व सुरक्षा विषयक बाबी व सुविधांची उपलब्धता या गावात आहे. त्यामुळे येथे तळ उभारणे सोयीस्कर ठरणार आहे. या तळाच्या उभारणीला वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वतीनेही मंजुरी देण्यात आली आहे. ‘डीआरडीओ’ने चाचणी तळ उभारताना मानवी सुरक्षा व पर्यावरणाची जपणूक या बाबींना सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे. त्याला अनुसरूनच नव्या तळाचेही काम करण्यात येईल. या तळावरून होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीचा या भागातील नागरिकांना विशेषतः मच्छीमार व शेतकऱ्यांना त्रास होऊ नये व त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे, असे ‘डीआरडीओ’च्या पत्रकात म्हटले आहे
विनय चाटी
स्रोत: वृत्तसंस्था