रशियाचा दावा: सोळा हजार भाडोत्री सैनिक युद्धात सहभागी
दि. १५ मार्च: युक्रेनमध्ये युरोप आणि पाश्चिमात्य देशांतील एकूण सोळा हजार भाडोत्री सैनिक लढत असून, त्यापैकी सहा हजार सैनिकांना ठार केल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनमध्ये युद्धात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व भाडोत्री सैनिकांचा तपशील आम्ही गोळा करीत आहोत व त्यांचा शोधही घेत आहोत, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी युक्रेनमध्ये रशियाविरोधात लढण्यासाठी आलेल्या सर्व परकी भाडोत्री सैनिकांचा तपशील जारी केला. त्यानुसार, वेगवेगळ्या देशांतून सुमारे १३ हजार ३८७ भाडोत्री सैनिक युक्रेनमध्ये युद्धात सहभागी होण्यासाठी आले आहेत. त्यापैकी पाच हजार ९६२ भाडोत्री सैनिक रशियन फौजांबरोबर झालेल्या संघर्षात ठार झाले आहेत. या सैनिकांमध्ये पोलंडमधून आलेल्या सैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. पोलंडमधून आलेल्या दोन हजार ६९० सैनिकांपैकी एक हजार ४९७ मारले गेले आहेत. तर जॉर्जियामधील ५६१, अमेरिकेमधील ४९१, कॅनडामधील ४२२, ब्रिटनमधील ३६०, रोमानियामधील ३४९, फ्रान्समधील १४७ व जर्मनीमधील ८८ भाडोत्री सैनिकांचा या मध्ये समावेश आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्र स्त्रोतांकडून पुष्टी होऊ शकली नाही.
रशियात अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर होणे महत्त्वाचे मानले जात आहे. कीव्ह इंडिपेंडंट या वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, रशियातील पुतीन यांची राजवट उलथवून लावण्यासाठी फ्रीडम ऑफ रशिया लिजन व सैबेरिया लिजन या दोन संघटना युक्रेनमधून कार्यरत आहेत. युक्रेनमधील रशियन नागरिकांनी या संघटना स्थापन केल्या आहेत. या संघटनांकडून पुतीन यांच्याविरोधातील चित्रफितीही प्रसारित करण्यात आल्या आहेत.
‘रशियाच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये पाश्चिमात्य देशांनी आपले सैनिक पाठविल्यास ती युद्धाला दिलेली चिथावणी मानण्यात येईल व प्रसंगी अण्वस्त्रांचा वापर करण्यासही रशिया मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा पुतीन यांनी गुरुवारी ‘रोस्सिया-१’ या वृत्तवाहिनीला व ‘आरआयए’ या रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिला होता. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी रशियाविरोधी युद्धासाठी युक्रेनमध्ये पाश्चिमात्य देशांतील सैनिक पाठविण्याचा विचार सुरु असल्याबद्दलचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी हा इशारा दिल्याचे मानले जात आहे.
विनय चाटी