लक्षद्वीप येथे भारत लष्करी तळ उभारणार

0

दि. ०२ मार्च: हिंदी महासागराचे भूराजकीय महत्त्व लक्षात घेता भारताच्या सागरी सामरिक रणनीतीचा भाग म्हणून लक्षद्वीप येथील मिनीकॉय बेटांवर कायमस्वरूपी नौदलतळ उभारण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून ‘आयएनएस जटायू’ हा नवा  नौदलतळ येथे कार्यरत होणार आहे.

हिंदी महासागर क्षेत्र भारतासाठी सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात भारताचा प्रभावही दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील आपले सामरिक हित जपण्यासाठी भारताला पावले उचलणे गरजेचे होते. त्यातच मालदीवचे नवे अध्यक्ष महंमद मोईझू यांनी ‘इंडिया आउट’ या त्यांच्या निवडणूक प्रचारकाळातील घोषणेला अनुसरून भारताला मालदीवमधून सैन्य माघारी घेण्याची सूचना केली. मोईझू हे चीनसमर्थक मानले जातात. त्यांच्या या पवित्रामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या क्षेत्रात भारताला फटका बसण्याची शक्यता होती. चीन आणि मोईझू यांच्या या खेळीला उलथवून लावण्यासाठी लक्षद्वीप येथील प्रस्तावित ‘आयएनएस जटायू’ हा नौदलतळ महत्त्वाचा मनाला जात आहे. हा प्रस्तावित तळ या भागातील एक महत्त्वाची ‘ऍसेट’ ठरणार आहे. या तळावर लढाऊ विमानेही तैनात केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात या तळावर मर्यादित संख्येतच अधिकारी आणि जवान यांची नेमणूक असणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात ही संख्या क्रमाक्रमाने वाढवण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या तळाबरोबरच मिनीकॉय बेटांवर एक हवाईपट्टीही बांधण्यात येणार आहे. या हवाईपट्टीचा उपयोग लष्करी व प्रवासी विमानानाही करता येणार आहे. या वेळी ‘आयएनएस जटायू’बरोबरच ‘एमएच ६० आर’ ‘रोमिओ’ हे नौदलाच्या हेलिकॉप्टरची नवी स्क्वाड्रनही येथे उभारण्यात उएणार आहे.

‘आयएनएस विक्रमादित्य’ व ‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या दोन विमानवाहू नौकांच्या उपस्थितीत ‘आयएनएस जटायू’चे  उद्घाटन होणार आहे, असे हा अधिकारी म्हणाला. ‘आयएनएस विक्रांत’ नौदलात समाविष्ट झाल्यापासून या दोन्ही विमानवाहू नौका दुसऱ्या वेळेस एकत्र येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मिलन-२४ या बहुपक्षीय नौदल कवायती दरम्यान या दोन्ही विमानवाहू नौका एकत्र आल्या होत्या. गेल्या दोन दशकांपासून भारत हिंदी महासागर क्षेत्रातील इतर देशांशी आपले नाविक संबंध वाढवीत आहे. मॉरिशसमधील  अगालेगा बेटांवर भारताच्या सहकार्याने बांधलेल्या नव्या हवाई पट्टीचे व नौदल धक्क्याचे उद्घाटन २८ फेबुवारी रोजी करण्यात आले. हिंदी महासागरातील पश्चिम क्षेत्रातील नाविक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मॉरिशस मधील तळाचा भारताला उपयोग होणार आहे. तसेच, या भागातील चीनच्या हालचालींनाही थोडा चाप बसणार आहे.

 

विनय चाटी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here