लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या महासंचालकांची ‘आर्मी बेस वर्कशॉप’ला भेट

0
लष्कराच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिकी अभियांत्रिकी’सेवेचे (डीजी- इएमइ) महासंचालक लेफ्टनंट जनरल जे. एस. सिदाना यांनी ‘५१२ आर्मी बेस वर्कशॉप’ला भेट दिली.

दि. ०४ मे: लष्कराच्या लष्कराच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिकी अभियांत्रिकी’सेवेचे (डीजी- इएमइ) महासंचालक लेफ्टनंट जनरल जे. एस. सिदाना यांनी पुण्यातील लष्कराच्या विविध वर्कशॉप आणि संरक्षण उत्पादन उद्योगांना शनिवारी भेट दिली. त्यांना या ठिकाणी सुरु असलेल्या विविध संशोधन प्रकल्प व उत्पादनांची माहिती देण्यात आली.

लेफ्टनंट जनरल सिदाना यांनी पुण्यातील खडकी येथे असलेल्या आणि लष्कराच्यादृष्टीने सामरिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘५१२ आर्मी बेस वर्कशॉप’ आणि ‘इंजीनियरिंग स्टॅटिक वर्कशॉप’ या दोन कार्यशाळांना (वर्कशॉप) भेट दिली व तेथे सुरु असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. पुण्यातील या दोन्ही कार्यशाळांमध्ये लष्कराच्या विविध शस्त्रप्रणालींची दुरुस्ती व देखभाल केली जाते व त्यांना युद्धसज्ज ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर या प्रणालीचे ‘री-इंजीनियरिंग आणि ‘री-बिल्डिंग’च्या माध्यमातून जतन करून त्या पुनर्वापरासाठी सज्ज ठेवण्यात येतात. त्यामुळे या दोन्ही कार्यशाळांना देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सामरिक महत्त्व आहे.

लष्कराच्या या दोन महत्त्वाच्या कार्यशाळांबरोबरच लेफ्टनंट जनरल सिदाना यांनी पुण्यातील संरक्षण सामग्री उत्पादन करणाऱ्या खासगी क्षेत्रातील उद्योगांनाही भेट दिली. अत्याधुनिक तोफांची (एटीएजीएस) व इतर शस्त्रप्रणालीचे उत्पादन करणाऱ्या भारत फोर्ज या प्रकल्पाला भेट देऊन तेथे सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणीही लेफ्टनंट जनरल सिदाना यांनी केली. भारत फोर्जमधील अधिकाऱ्यांनी त्यांना या प्रणालींची माहिती दिली.

विनय चाटी


Spread the love
Previous articleभारतानेच निज्जरची हत्या केली: कॅनडाचे नेते जगमीत सिंग यांचा आरोप
Next articleIndian Army’s DG-EME Inspects Weapon Platform Maintenance in Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here