हवाईदलाच्या तंजावूर तळावर हेलिकॉप्टरची नवी तुकडी

0
IAF
हवाईदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रमुख एअरमार्शल मणिकांतन यांच्या उपस्थितीत नवी हेलिकॉप्टर तुकडी तंजावूर तळावर समाविष्ट करण्यात आली. फोटो स्त्रोत: पीआयबी

दि. २१ मार्च: हवाईदलाच्या तंजावूर  हवाईतळावर ‘चेतक’ हेलिकॉप्टरची नवी तुकडी समाविष्ट आली आहे. हवाईदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रमुख एअरमार्शल मणिकांतन यांच्या उपस्थितीत ही तुकडी तंजावूर तळावर समाविष्ट करण्यात आली. या नव्या तुकडीच्या समावेशामुळे दक्षिण विभागाची कार्यक्षमता वाढणार आहे, असे हवाईदलाच्यावतीने सांगण्यात आले. चीनचा हिंदी महासागरातील वावर गेल्या काही वर्षात वाढला आहे. तसेच, मालदीवबरोबरही भारताच्या द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवाईदलाच्या या तळावर हेलिकॉप्टर तुकडी तैनात करणे महत्त्वाचे मानले जात आहे.

महत्त्वाचा हवाईतळ 

हिंदी महासागर क्षेत्राचे वाढते महत्त्व लक्षात घेता व या भागातील हवाईदलाच्या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने १९८४ मध्ये हवाईदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाची स्थापना करण्यात आली. तंजावूर हवाईतळावर हेलिकॉप्टर तुकडी समाविष्ट करणे हे त्याच मालिकेतील एक पाऊल मानले जात आहे. ‘तंजावूर येथे उभारण्यात आलेल्या हेलिकॉप्टरच्या नव्या तुकडीमुळे या तळाची कार्यक्षमता वाढणार आहे. तसेच, मानवीय मदत, नैसर्गिक आपत्तीतील मदतकार्य व आणीबाणीच्या प्रसंगी अपघातग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी या तुकडीची मदत होणार आहे. त्याचबरोबर शांतताकाळातील इतर उद्दिष्टांसाठी या तुकडीचा उपयोग होणार आहे,’ असे हवाईदलाच्या पत्रकात म्हटले आहे. तंजावूर तळावर पूर्वीपासूनच सुखोई या अत्याधुनिक लढाऊ विमानांची तुकडी तैनात आहे. ही तुकडी स्क्वाड्रन-२२२ अथवा ‘टायगरशार्क’ या नावाने ओळखली जाते.

सामरिक महत्त्व 

गेल्या काही वर्षात चीनकडून हिंदी महासागर क्षेत्रात सातत्याने घुसखोरी करण्यात येत आहे. या भागातील त्यांचा वावरही वाढला आहे. श्रीलंका व मालदीव येथे सागरी संशोधनाच्या नावाखाली चीनच्या हेरगिरी करणाऱ्या जहाजांचा वावरही वाढला आहे. तसेच, मालदीवमध्ये चीनधार्जिण्या महंमद मोईझू यांचे सरकार स्थापन झाल्यापासून भारत आणि मालदीव यांच्या द्विपक्षीय संबंधातही तणाव निर्माण झाला आहे. मालदीव हे सागरी व्यापार मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने भू-सामरिकदृष्ट्या त्याचे महत्त्व आहे. मालदीवमधील बदलत्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारताने लक्षद्वीप येथील मिनीकॉय बेटांवर आपला ‘आयएनएस जटायू’ हा नवा नौदलतळ उभारला आहे. नौदलप्रमुख ॲडमिरल हरीकुमार यांच्या उपस्थित सहा  मार्च रोजी त्याचे उद्घाटन झाले. हा नौदलतळही हवाईदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार व अरबी समुद्रातील लक्षद्वीप या संपूर्ण भागाची सुरक्षा हवाईदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाची जबादारी आहे. त्या पार्श्वभूमीवर तंजावूर येथे नवी हेलिकॉप्टर तुकडी उभारणे महत्त्वाचे मानले जात आहे.

विनय चाटी

स्त्रोत: पीआयबी


Spread the love
Previous article‘तेजस मार्क-१ए’ मार्चअखेर हवाईदलात
Next articleRussia Delays Delivery of S-400 Air Defence Missile to India till 2026

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here