हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची उत्तर कोरिया कडून चाचणी

0
missile

अण्वस्त्रक्षमतेचा दावा: घन इंधनावर आधारित मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र

दि. ०३ एप्रिल: घन इंधनावर आधारित अण्वस्त्रक्षम हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे विभागीय शस्त्रस्पर्धा वाढीस लागणार असून, आशिया तसेच अमेरिकेलाही अण्वस्त्र युद्धाचा धोका वाढणार आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे.

उत्तर कोरियाने आपली राजधानी प्योंगयांगजवळ असलेल्या एका गुप्त चाचणी तळावरून क्षेपणास्त्र चाचणी घेतल्याचे दक्षिण कोरिया आणि जपानी लष्कराने मंगळवारी म्हटले होते. त्यानंतर आज, बुधवारी उत्तर कोरियाच्या कोरियन सेन्ट्रल न्यूज एजन्सी या वृत्तसंस्थेकडून या क्षेपणास्त्र चाचणीची पुष्टी करण्यात आली. ‘या क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन उपस्थित होते. ह्वासोंग१६बी या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या आण्विक प्रतिकार व संरक्षण क्षमतेत वाढ झाली आहे. या पुढील काळातही आपल्या शत्रूंना जरब बसवण्यासाठी उत्तर कोरिया आपला क्षेपणास्त्र व अण्वस्त्र विकास कार्यक्रम सुरूच ठेवेल,’ असे किम यांनी म्हटल्याचे कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. स्वाभाविकच किम यांचा रोख अमेरिका, दक्षिण कोरिया व जपान कडे असल्याचे स्पष्ट आहे.

गेल्या काही वर्षापासून उत्तर कोरियाने घनरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्राच्या विकसनावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. द्रवरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्रांच्या तुलनेत ही क्षेपणास्त्रे वजनाला हलकी व हालचालीस अधिक सक्षम आहेत. ती अत्यंत परिणामकारक पद्धतीने शत्रूपासून लपविता येतात. तसेच, माऱ्यासाठी कमी वेळात तयार करता येतात. या उलट द्रवरूप  इंधन असलेली क्षेपणास्त्रे माऱ्यासाठी तयार करण्यास विलंब लागतो. या क्षेपणास्त्रात ती प्रक्षेपित करण्यापूर्वी इंधन भरणे अपेक्षित असते. या क्षेपणास्त्रांमध्ये फार काळ इंधन भरून ठेवता येणे शक्य नसल्यामुळे ती माऱ्यासाठी तयार करण्यास विलंब होतो. उत्तर कोरियाने गेल्या वर्षी घनरूप इंधनावर आधारित आंतरखंडीय क्षेपणास्त्राची प्रथमच चाचणी घेतली होती. अमेरिकेच्या मुख्य भूमीवर मारा करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. घनरूप इंधनाचा वापर करून जमीन, समुद्र व आकाशातून मारा करणारी, तसेच पाणबुडीतून मारा करण्यास सक्षम असणारी लघु व मध्यम पल्याची क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाने यापूर्वीच विकसित केली आहेत. दक्षिण कोरिया व जपान हे त्यांचे लक्ष्य असल्याचे म्हटले जाते. उत्तर कोरियाने गेल्या काही महिन्यात या क्षेपणास्त्राची प्रात्यक्षिके व सिम्युलेटेड अण्वस्त्र हल्ला करण्याची प्रात्यक्षिकेही आयोजित केली होती. मंगळवारी चाचणी घेण्यात आलेले हे क्षेपणास्त्र १०१ किमी उंचीवर पोहोचले आणि एक हजार किमी प्रतितास या वेगाने लक्ष्याकडे झेपावले, असे कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

(एपीच्या ‘इनपुट्स’सह)


Spread the love
Previous articleलष्करभरतीच्या वयोमर्यादेत युक्रेनकडून शिथिलता
Next articleNaval Group Wins Contract To Build Two Submarines for Indonesian Navy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here