हौती बंडखोरांची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त

0
छायाचित्र: इराणचे ड्रोन (विकिमीडिया)

अमेरिकेचा दावा: लाल समुद्रात केली कारवाई

दि. ०९ एप्रिल: लाल समुद्रात हौती बंडखोरांनी तैनात केलेली हवाई सुरक्षा व ड्रोन यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. मात्र, या हल्ल्यात कसलीही जीवितहानी झाली नाही, असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. इराणच्या पाठींब्यावर येमेनमधून या बंडखोरांच्या कारवाया सुरु आहेत.

हौती बंडखोरांच्या ताब्यात येमेनचा बराच भाग आहे. या भागात त्यांनी डागण्यासाठी सज्ज ठेवलेली दोन क्षेपणास्त्रे अमेरिकी हल्ल्यात नष्ट करण्यात आली व या भागातून लाल समुद्रातील लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी सोडण्यात आलेले एक चालक विरहित विमान पाडण्यात आले, असे अमेरिकेच्या लष्कराच्या मध्य विभागाने (सेंटकॉम) ‘एक्स’ अकाऊंटवर म्हटले आहे. तर, लाल समुद्रात असलेल्या ब्रिटिश, अमेरिकी व इस्त्राईलच्या जहाजांवर हल्ला केल्याचा दावा हौती बंडखोरांनी केला आहे. इस्त्राईल विरुद्ध युद्धात पॅलेस्टाईनला पाठींबा देण्यासाठी लाल समुद्रातील अमेरिका व मित्रदेशांच्या जहाजांना लक्ष्य करीत असल्याचे हौतींचे म्हणणे आहे.

हौतींच्या ताब्यातील येमेनमधून एक जहाजविरोधी क्षेपणास्त्र एडनच्या आखातात डागण्यात आले. मात्र, यात अमेरिका अथवा मित्रदेशांपैकी कोणाच्याही जहाजांचे नुकसान झाले नाही किंवा कोणालाही इजा झाली नाही, असे ‘सेंटकॉम’ने म्हटले आहे. हौती बंडखोरांनी चालविलेल्या या हल्ल्यांच्या सत्रामुळे सुएझ कालव्यातून होणारी जागतिक व्यापार वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे व्यापारी जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून जावे लागत आहे. गाझामधील युद्धात हमासला पाठींबा देण्यासाठी हौतींकडून हे हल्लासत्र सुरु करण्यात आले आहे. येमेनच्या उत्तर आणि पूर्व भागावर यांचे नियंत्रण असून, त्यांना इराणचा  पाठींबाअसल्याचे म्हटले जाते. इस्त्राईलने गाझापट्टीत हमासविरुद्ध पुकारलेल्या युद्धात आत्तापर्यंत ३३ हजार नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान, गाझामध्ये युद्धबंदी करण्याबाबत कतार आणि ईजिप्तच्या मध्यस्थांकडून आलेला प्रस्ताव हमासने फेटाळून लावला आहे.

पिनाकी चक्रवर्ती


Spread the love
Previous article‘अनपेक्षित आव्हानांच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहा’
Next article30th Commemoration Of The Rwandan Genocide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here