संरक्षणमंत्र्यांची उपस्थिती: सर्वंकष सुरक्षेचा आढावा घेणार
दि. २७ मार्च: भारतीय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्त्वाचे सर्वोच्च्च व्यासपीठ असलेली ‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’ उद्या, गुरुवारपासून सुरु होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग या परिषदेचे उद्घाटन करणार असून, या परिषदेत देशाच्या सर्वंकष सुरक्षेचा आढावा, तसेच लष्कराबाबतच्या सैद्धांतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ही परिषद ‘हायब्रीड मोड’मध्ये होणार असून, पहिल्या टप्प्यात ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून लष्करी अधिकारी या परिषदेत सहभागी होतील, तर नवी दिल्लीतील दुसऱ्या टप्प्यात हे अधिकारी परिषदेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली २८ मार्चपासून ही परिषद सुरु होणार आहे. हे सत्र ‘व्हर्चुअल’ असणार आहे. या सत्रात लष्कराच्या विविध विभाग मुख्यालयाचे प्रमुख (आर्मी कमांडर) त्यांच्या मुख्यालायातूनच सहभागी होणार आहेत. या टप्प्यात लष्कराचे सध्या सेवेत असलेले व निवृत्त जवान आणि अधिकारी यांच्यासाठी राबविण्याच्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर सध्या वेगाने बदलत असलेली भूराजकीय व भूसामारिक परीस्थिती व त्याचा देशाच्या सुरक्षेवर होणारा परिणाम, या विषयावर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा संपूर्ण आढावा, सैद्धांतिक मुद्दे या विषयी चर्चा करण्याबरोबरच भविष्यातील योजनांचा आराखडाही या परिषदेत ठरविण्यात येणार आहे.
लष्कर व सुरक्षेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या परिषदेचा दुसरा टप्पा एक एप्रिलपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या मार्गदर्शनाने परिषदेचा समारोप होईल. या टप्प्यात लष्कराच्या कार्यक्षमतेत अधिक परिणामकारकता आणणे, संशोधन व नावोन्मेश वाढविण्याबाबत प्रयत्न करणे, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक परिणामकारक प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबविणे या विषयांवर चर्चा होईल. तसेच, लष्करी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आवश्यक कल्याणकारी उपक्रम राबविण्याबाबत या परिषदेत विचार करण्यात येणार आहे. लष्कराची समूह विमा योजना राबविण्याबाबत आर्थिक व्यवस्थापन तज्ज्ञांबरोबर बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. हे बैठक लष्करप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली होईल.
संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्यासह नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार, हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी या परिषदेत लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्त्वाला मार्गदर्शन करणार आहेत. समारोपाच्या सत्रात संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांचे बीजभाषण होणार आहे. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या परिषदेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसमोर असणारे विषय, त्यांचा एकूण परीघ लक्षात घेता, भविष्यात भारतीय लष्कर एक सर्वसमावेशक, प्रगतीशील, भविष्याकडे पाहणारे व भविष्यातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सक्षम करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी